‘एकनाथ शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत..’; बच्चू कडूंचं सूचक विधान
![Bacchu Kadu said that if Eknath Shinde is not the chief minister, then maybe we will take such a decision](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Bacchu-Kadu-2-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या घरी चहापानासाठी जाणार आहेत. त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यावरून बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी, त्यांनी एक सूचक विधान केलं आहे.
बच्चू कडू म्हणाले, १० वर्षांपूर्वी विदर्भ मिल बंद पडली आणि फिनले मिलचा विस्तार इतर ठिकाणी होणार होता. तेव्हा शरद पवार कृषीमंत्री होते. मी आणि आर. आर. आबा त्यांना भेटायला गेलो. तेव्हा शंकरसिंह वस्त्रोद्योग मंत्री होते. त्यांच्याशी शरद पवारांनी चर्चा केल्यामुळे ती मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली. त्याची जाणीव म्हणून आम्ही शरद पवारांना आमंत्रण दिलं. त्यामुळे ते घरी चहापानासाठी येणार आहेत. मदतीची जाणीव म्हणून आम्ही त्यांना फोन केला. आता इथून चाललेच आहेत तर घरी या असं आम्ही त्यांना सांगितलं. ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं.
हेही वाचा – केएल राहुलचे रेकॉर्डब्रेक शतक! अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
बच्चू कडू सरकारमधून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर बच्चू कडू म्हणाले, त्यासाठी सरकारवर टीका-टिप्पणी, नाराजी वगैरे सगळं करण्याची गरज नाही. आम्ही सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहोत. जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नसतील तर मग कदाचित आम्ही तसा निर्णय घेऊ, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
आमचा पक्ष आहे. पक्षाचं भलं कुठे होतंय, त्यानुसार विचार केला जाईल. जिथे राजकीय अस्तित्व मजबूत होईल, तो आमचा राजकीय सोबती असेल. आम्ही एक-दोन जागेसाठी काही करणार नाही. केलं तर तीन-चार जागा घेऊनच महाविका आघाडीकडे जाण्याचा विचार करू. नाहीतर तसं काही करण्यात अर्थ नाही आणि निवड अमरावतीच का? अनेक मतदारसंघ आहेत. वर्धाही आहे. यवतमाळही आहे. जळगावही आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.