अर्थमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारताच अजितदादांचा ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांवर निधीवर्षाव
![As soon as he accepted the post of Finance Minister, Ajit Dada showered funds on NCP MLAs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/ajit-pawar-MLA-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांनी अर्थमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारताच राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीवर्षाव केला आहे. अजिदादांनी आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला असून, त्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे. तर शिंदे गटातील आमदारांनाही निधी मंजूर करण्यात आला आहे.
विधीमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातूनच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या आमदारांच्या विकास कामांसाठी किमान २५ कोटी ते ५० कोटींपर्यत निधी मंजूर करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा – इरशाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले
नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांना मतदारसंघातील रखडलेल्या विकास कामांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी देखील निधी मंजूर झाला आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना निधी मंजूर झालेला नाही. अन्य काही आमदारांनाही निधी मिळालेला नाही.
दरम्यान, निधीवाटपावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. राज्याचा समतोल विकस केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देतात. मग, सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना विशेष निधी आणि विरोधी आमदारांना डावलून समतोल विकास कसा साधला जाईल? असा सवाल उपस्थित केला आहे.