दिल्लीत अमित शाह आणि विनोद तावडेंमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा
नवी दिल्ली | विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि. २७ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल असे सांगितले. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्यानंतर आता भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदी कुणाला बसवायचे, याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात काल याविषयावर दीर्घ चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात बुधवारी रात्री ४० मिनिटे चर्चा झाली. बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास त्याचा मराठा मतांवर काय परिणाम होईल, याचा आढावा शाहांनी घेतला असल्याची माहिती मिळत आहे. आगामी निवडणुका, फडणवीसांचा चेहरा आणि मराठा-ओबीसी मतांबाबत शाहांनी माहिती घेतली.
हेही वाचा – रस्ते अपघातातील मृत्युंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा; जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
दरम्यान, मागच्या दोन वर्षांत भाजपाने इतर राज्यांमध्ये प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला करून नवे नेतृत्व दिले आहे. मध्य प्रदेशमध्ये त्यांनी शिवराज सिंह चौहान यांच्या जागी डॉ. मोहन यादव, छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांच्याऐवजी विष्णू देव साय, राजस्थानमध्ये वसुधंरा राजे यांच्याऐवजी भजनलाल शर्मा आणि हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांना बाजूला सारून नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले. भाजपाने इतर राज्यात ज्याप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करून नवे नेतृत्व समोर आणले, तसाच प्रयोग महाराष्ट्रात होणार का? हे येणाऱ्या दिवसांत समजू शकेल.