‘मोदींचा नाही तर उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन जिंकलो’; अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया

मुंबई | दक्षिण मुंबईतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत विजयी झाले आहेत. अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा तब्बल ५४ मतांनी पराभव करत त्यांच्या विजयाची हॅट्ट्रीक साधली आहे. विजयानंतर अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया दिली. यावेळी त्यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, ज्या विश्वासाने उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली. त्यासाठी त्यांचे मी आभार मानतो व मी एकही पैसा न वाटता मला मतदान करणाऱ्या मतदारांचा मी कायम कृतज्ञ राहीन. मोदींचा चेहरा घेऊन जिंकत आलो असा आमच्यावर कायम आरोप झाला. आज मला खूप आनंद होतोय की मी उद्धव ठाकरेंचा चेहरा घेऊन जिंकलोय. मोदींचा चेहरा न घेता जिंकलो याचा मला जास्त आनंद आहे. आदरणीय उद्धव ठाकरे हे या निवडणूकीचे मॅन ऑफ द सिरीज आहेत. त्यांच्याभोवती ही निवडणूक फिरत होती. त्यांचं कोव्हिडमध्ये केलेलं काम आणि त्यानंतर त्यांच्यासोबत झालेला दगा त्याचा लोकांना राग होता.
हेही वाचा – महाराष्ट्रातील पहिला निकाल समोर, भाजपच्या उमेदवाराची बाजी
उद्धव ठाकरेंनी ज्या आक्रमकपणे राज्यात प्रचार केला व टक्कर दिली. ते महाराष्ट्राच्या इतिहासात लिहले जाईल. ते ४०० पार जाणार होते आता विचारा त्यांना की कुठे आहेत. ते जेमतेम २३५ वर आहेत. त्यांनी बहुमताचा आकडा पार केलेला नाही. आता त्यांची जमवाजमवी सुरू झाली असेल. हे त्यांचं स्किल आहे, असंही अरविंद सावंत म्हणाले.




