‘भाजपाच्या आमदारानं श्वानाचं नाव शंभू ठेवलं’; अनिल परब यांचा हल्लाबोल

मुंबई | छत्रपती संभाजी महाराजांवर धर्म बदलण्यासाठी अत्याचार झाले. तरी त्यांनी धर्म बदलला नाही. तसेच पक्ष बदलण्यासाठी माझाही तुरुंगात छळ झाला. तरी मी पक्ष बदलला नाही, असं विधान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर भाजपाने जोरदार आक्षेप घेत आज विधानपरिषेदेचे कामकाज रोखून धरले. अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केली असल्याचा आरोप भाजपाचे नेते प्रवीण दरेकर, नितेश राणे यांनी केला. यानंतर अनिल परब यांनी आपली भूमिका मांडली.
अनिल परब म्हणाले, की छत्रपती संभाजी महाराज माझे दैवत आहेत. त्यांच्या पायावर डोके ठेवायला मला लाज वाटणार नाही. मी काल जे बोललो, त्यातून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला नाही. जर मी बोललेलो चुकीचे असेल तर माझे विधान कामकाजातून काढून टाकावे. तसेच मला समज देण्याचा सभापतींचा अधिकार आहे. पण सत्ताधारी बाकावरील आमदार मला समज देणारे कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरूच राहणार; मंत्री आदिती तटकरे
मी काल बोललो की, छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा छळ पक्ष बदलण्यासाठी केला. यात मी काहीच चुकीचे बोललो नाही. तरीदेखील सभापतींना वाटत असेल की, मी चुकीचे बोललो, तर ते विधान कामकाजातून काढून टाकावे, असं अनिल परब म्हणाले.
या सभागृहातील एका सदस्याने आपल्या श्वानाचे नाव शंभू ठेवले होते. त्याने आधी माफी मागावी. प्रशांत कोरकटकर, राहूल सोलापूरकर यांच्यावरून विषय हटविण्यासाठी माझ्याविरोधात आरोप केले जात आहेत. यानंतर संबंधित आमदाराचे नाव सांगा, असे सांगितले गेल्यानंतर अनिल परब यांनी भाजपाचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे नाव घेतले. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात श्रीकांत भारतीय यांनी आपल्या श्वानाचे नाव शंभू ठेवले होते. त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही टाकली होती. तसेच वाद उद्भवल्यानंतर त्यांनी त्यांनी माफीही मागितली आणि पोस्ट डिलीट केली, असंही अनिल परब म्हणाले.