breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगातच

अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगातच

अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज CBI न्यायालयाने फेटाळला

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावलाय. ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात हायकोर्टाने गेल्या आठवड्यात त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीवेळीही जामीन मिळून देशमुख यंदाची दिवाळी आपल्या घरी साजरी करतील, अशी आशा त्यांच्या कुटुंबियांना आणि समर्थकांना होती. पण सीबीआय कोर्टाने देशमुखांना जामीन देण्यास नकार देताना त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या अनिल देशमुख यांना ११ महिने गजाआड राहिल्यानंतर गेल्या आठवड्यात दिलासा मिळाला. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र आज सीबीआयच्या गुन्ह्यात जामीन नसल्याने अनिल देशमुख यांचा तुरुंगवास तूर्त कायम राहणार आहे.

अनिल देशमुख हे हृदयविकाराने त्रस्त आहेत. खासगी रुग्णालयात उपचार करायला मिळावेत, अशी मागणी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. कोर्टाने त्यांची विनंती मान्य केली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चार दिवसांपूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीये.

दरम्यान, देशमुख यांचा जामीन अर्ज जवळपास सात महिन्यांपासून प्रलंबित राहिल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त करत मुंबई हायकोर्टाला लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करून निर्णय देण्याचे निर्देश दिले होते.

नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी वसुलीबाबत माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर मुंबई हायकोर्टाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचा आदेश दिला. त्यानंतर प्राथमिक चौकशीअंती सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला. या एफआयआरच्या आधारे ईडीनेही अनिल देशमुख तसेच त्यांचा स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना अटक केली. मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी म्हणून उकळलेली चार कोटी रुपयांहून अधिकची रक्कम देशमुख यांनी नागपूरस्थित आपल्या शिक्षण संस्थेत वळवून मनी लॉन्ड्रिंग केले, असा आरोप ईडीने ठेवला आहे. याप्रकरणी ईडीने त्यांच्यासह अन्य आरोपींविरोधात कोर्टात आरोपपत्रही दाखल केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button