अनिल देशमुखांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
![Anil Deshmukh meets Chief Minister; State Cabinet meeting today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Uddhav-Thackeray-Anil-Deshmukh-2.jpg)
मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून गंभीर आरोप केल्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मंगळवारी एक तास ही बैठक सुरू होती. महत्त्वाचे म्हणजे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून त्याच्या एक दिवस आधीच ही भेट झाली आहे.
वाचा :-#PhoneTapping: मुख्यमंत्र्यांनी मौन का बाळगलंय? खासदार संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले…
अनिल देशमुख यांनी सध्या अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटींची खंडणी वसूल करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. या आरोपांनंतर राज्यात खळबळ माजली असून यानंतर पहिल्यांदाच अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. दरम्यान, अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. तर दुसरीकडे परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर राज्यात विरोधी पक्ष आक्रमक झाला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मौन बाळगले आहे.
तसेच परमबीर सिंग यांचे पत्र आणि विरोधकांकडून राज्य सरकारवर फोन टॅपिंग प्रकरणी झालेल्या गंभीर आरोपानंतर आज पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.