इंडिया आघाडीच्या हालचालीनंतर भाजप सतर्क, तातडीने देशभरातील 241 खासदारांना दिल्लीत बोलवलं
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-2024-06-06T004854.027-780x470.jpg)
नवी दिल्ली : आपण जे पेरतो तेच उगवतं, असं म्हणतात. ही दुनिया गोल आणि खूप लहान आहे. माणूस फिरून त्याच ठिकाणी येतो, असं आपण बऱ्याचदा ऐकलं असेल. देशातील सर्वात मोठ्या भाजप पक्षाला अशाच काही गोष्टींमधून सामोरं जावं लागत आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना खिंडार पाडलं. देशभरातील विविध राज्यांमध्ये ऑपरेशन लोटस राबवत पक्ष फोडले, सत्तांतर घडवून आणलं किंवा तशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आणि आता भाजपलाच केंद्रात आपल्या अस्तित्वाचं सरकार आणण्यासाठी झुंजावं लागत आहे. विशेष म्हणजे आपले खासदार फुटू नयेत यासाठी आता भाजपकडून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाची धडकी भरल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने देशातील सगळे 241 खासदार दिल्लीत बोलावले आहेत. इंडिया आघाडीच्या हालचालीनंतर भाजप पक्ष सतर्क झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून भाजपने सर्व 241 खासदारांना दिल्लीत बोलवलं आहे. एनडीए आघाडी येत्या 7 तारखेला सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएच्या खासदारांना संध्याकाळी 7 तारखेला संध्याकाळी 5 ते 7 वाजेची वेळ दिली आहे. यावेळी एनडीएचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. पण त्याआधी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपकडून विशेष काळजी घेतली जात आहे.
एनडीएची दिल्लीत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते. तसेच एनडीएच्या घटकपक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यात आलं. तसेच नरेंद्र मोदी यांचं नाव पुन्हा पंतप्रधान पदासाठी निश्चित करण्यात आलं. सर्वांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला समर्थन दिलं. शक्य तितक्या लवकर सरकार स्थापन करा, असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बैठकीत म्हणाले. तसेच आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं आश्वासन नितीश कुमार यांनी दिलं.
दरम्यान, भाजप नेतृत्वाकडून एनडीएतील घटक पक्षांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्या रात्रीपर्यंत दिल्लीत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या 7 तारखेला भाजप नेतृत्वासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. केंद्रात नव्या सरकारच्या स्थापनेपूर्वी भाजप नेतृत्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काय सांगितलं जातं ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.