breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

Ground Report । पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर अजित पवार समर्थकांचा ‘डोळा’!

शहरातील राजकारणात आगामी १५ दिवसांत भूकंप

अजित पवार समर्थक मोठा गट ‘मविआ’ च्या गळाला

पिंपरी : लोकसभा निवडणुकीतील भव्य यशानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा ‘स्ट्राईक रेट’ सर्वाधिक असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीकरिता ‘इनकमिंग’ ला उधाण आले आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भाेसरी मतदार संघामध्ये महायुतीचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटातील तुल्यबळ नेत्यांना संधी मिळेल, याची अनिश्चितता आहे. परिणामी, अजित पवार गटातील तीव्र इच्छुकांनी महाविकास आघाडीच्या तिकीटांवर ‘डोळा’ ठेवला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार’’ अशी स्थिती होती. पण, लोकसभा निवडणुकीनंतर समीकरण बदलले. शरद पवार गटाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. वाऱ्याची दिशा ओळखून अजित पवार आणि भाजपासोबत महायुतीमध्ये गेलेले तगडे ‘फलंदाज’ आता ‘बॅक टू पॅव्हेलिअन’ पहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, आमदारकीसाठी तीव्र इच्छुक असलेल्या या दिग्गजांनी आता महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाकडे प्रचंड ‘फिल्डिंग’ लावली आहे.

आगामी १५ दिवसांत शहरातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होणार असून, अजित पवार गटातील २० ते २५ आणि भाजपामधील किमान ६ माजी नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये दोन मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. किंबहुना, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहीत पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चेची एक फेरी पूर्ण झाली आहे. ‘‘पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदार संघात आमच्यासोबत येणाऱ्या इच्छुकांना संधी द्या. महायुतीला आस्मान दाखवू..’’ अशा प्रकारची ग्वाही संबंधित मातब्बर नेत्यांनी मविआच्या प्रमुख नेत्यांना दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.

पिंपरीत ‘मशाल’ पेटणार…
पिंपरी विधानसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आण्णा बनसोडे आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये हा मतदार संघ ठाकरे गटाला सुटावा आणि आपली वर्णी लागावी म्हणून अजित पवार यांच्या ‘गुड बॉक्स’मधील एक ज्येष्ठ माजी नगरसेविका यांनी ‘मातोश्री’वर वारी केली आहे. या मतदार संघातून ‘मशाल’ चिन्हावर लढण्यासाठी सर्व नितींचा अवलंब करण्याची तयारी आहे. विशेष म्हणजे, अजित पवार गट महायुतीमध्ये सामील झाला नसता, तर राष्ट्रवादीची उमेदवारी याच नगरसेविकेला निश्चित मानली जात होती. त्यामुळे आता बदललेल्या समीकरणानुसार, अजित पवार यांच्या निकटवर्ती नगरसेविका ‘मशाल’ चिन्हावर लढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

चिंचवडमध्ये ‘तुतारी’ला पसंती;

अजित पवार गटातील इच्छुकांची ‘भाऊ’गर्दी…
चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपाच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप आहेत. या मतदार संघातून भाजपाचेच शहराध्यक्ष शंकर जगताप यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. यासोबत अजित पवार गटातील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनीही लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील उमेदवारीवर वर्णी लावण्यासाठी महायुतील इच्छुकांची धडपड सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हा मतदार संघ ‘तुतारी’ ऐवजी मशालवर लढवण्यासाठी इच्छुकांची पहिली पसंती आहे, असा दावा केला जातो. मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत ‘मशाल’ चिन्हावर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी’ फुंकण्याचा कयास आहे.

भोसरीमध्ये तुतारी अन्‌ मशाल दोन्ही दगडांवर पाय…

भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यामुळे अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची अडचण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना निवडणूक लढवायची असेल, तर महाविकास आघाडीचे तिकीट खेचून आणावे लागणार आहे. जागा वाटपामध्ये हा मतदार संघ कोणत्या पक्षाला जाणार? याबाबत अद्याप सुस्पष्टता नाही. त्यामुळे ‘मातोश्री’ आणि ‘मोतीबाग’ अशा दोन्ही ठिकाणी इच्छुकांनी ‘फिल्डिंग’ लावल्याचे विश्वनीय सूत्रांकडून समजले. काहीही झाले, तरी या मतदार संघात माजी आमदार विलास लांडे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button