अजित पवारांची पिंपरीत तुफान फटकेबाजी; म्हणाले, मी अद्याप दारुला स्पर्शही केलेला नाही..
![Ajit Pawar said that I have not even touched alcohol yet](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Ajit-Pawar-1-4-780x470.jpg)
पिंपरी : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने ६३ व्या द्राक्ष परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी बोलताना तुफान फटकेबाजी केली. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मी अद्याप दारुला स्पर्शही केलेला नाही, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, देशी दारुच्या दुकानांना वाईन शॉप म्हटलं जातं. त्यामुळे काहींचा असा समज झाला की सरकार वाईनची दुकानं वाटणार का? मुळात वाईनची दुकानं आणि द्राक्षापासून तयार केली जाणारी वाईन यामध्ये फरक आहे. काही देशांमध्ये तर वाईन हा पाण्याला असणारा पर्याय आहे. मी हे सगळं अधिकारवाणीने सांगतोय कारण मी अद्याप दारुला स्पर्शही केलेला नाही.
दर्दी लोक सांगतात इतर काही गोष्ट घेतली की किक बसते, वाईनने किक बसत नाही. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. मी कधीच त्या गोष्टीला स्पर्श केला नाही. माझ्या सोबत काम करणाऱ्या अनेकांना माहिती आहे, असं अजित पवार म्हणाले. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
हेही वाचा – ठरलं तर! गणेश चतुर्थीला Jio AirFiber लाँच होणार, मुकेश अंबानींची घोषणा
मी अर्थमंत्री अन उपमुख्यमंत्री असल्यानं तुम्ही मला आज मोठेपण दिलं. आता तुम्ही अजित पवारला आज बोलावलं, का बोलावलं? कारण अजित पवारकडे अर्थ खातं आहे. उपमुख्यमंत्री पद आहे. त्याच्याकडून आपलं काम होईल, म्हणून त्याला मोठेपण दिलं. त्याला ही वाटेल द्राक्ष बागायतदार आपल्याला विसरला नाही. तुमच्या जागी मी असतो तर हेच केलं असतं, असं अजित पवार म्हणाले.
आदरणीय शरद पवारसाहेब नेहमीच तुमच्या मदतीला धावले. ते कृषिमंत्री असल्यापासून शेतकऱ्यांच्या मदतीला येतात. म्हणूनच या परिषदेच्या शुभारंभाला शरद पवारसाहेब आले होते. आज समारोपाला अजित पवार आलेत. आता सगळे म्हणतील काय पवार-पवार चालवलंय. मुळातच तुमच्या द्राक्ष बागायतदार संघाचे चेअरमनचं शिवाजी पवारच आहेत! आता सगळेच पवार म्हटल्यावर पवारांचं चाललंय काय? अशी चर्चा रंगणार, असंही अजित पवार म्हणाले.