अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद
मनसे-अजित पवार गटातील वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
![Ajit Pawar, NCP, Congress, Controversy, Start, Background, Raj Thackeray, Chief Minister, Visit,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/mns-leader-780x470.jpg)
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेवर टीका केली होती. मनसेतील नेते हे सुपारीबाज, दारू पिणारे, पळ काढणारे असे मिटकरी यांनी म्हटले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली असली तरी त्यात राजकीय पार्श्वभूमीसुद्धा आहे.
या विषयांवर चर्चा
विविध विषयांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमवेत वर्षा येथे शनिवारी बैठक झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर चर्चा झाली. मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील,मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर,अभिजित पानसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यशश्री शिंदे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टावर चालवा
उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची हत्या झाली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. नवी मुंबई येथे अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरण देखील फास्ट ट्रॅकवर चालवावे आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. आरक्षण आणि जातीवाद या विषयावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
राज्यात महिलांसंदर्भात निर्माण झालेली कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, महायुतीत मनसेची भूमिका काय असणार? या विषयावर देखील दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पुण्यात आलेला पूर, शहरांचा नियोजन, वाढती बांधकामे, पाणी व्यवस्थापन आणि राज्यात रखडलेले महत्वाचे प्रकल्प या विषयांवर देखील राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.