‘राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर’; आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा
सुषमा अंधारे, सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणाऱ्यांवर अद्याप कारवाई नाही
मुंबई : राम नवमीच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. राज्यात छत्रपती संभाजीनगर येथे राम नवमीच्या आदल्या दिवशी झालेल्या हिंसाचारामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात असलेल्या गृहखात्यावर विरोधकांकडून निशाण साधण्यात येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
कायदा-सुव्यवस्था हा आपल्या राज्यातील मोठा प्रश्न बनला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी निर्माण झालेली परिस्थिती आता बेकार बनत चालली आहे. राऊतांना मिळालेल्या धमकीबाबत पोलिसांनी तपास करून कारवाई तर केली पाहिजे पण महिलांवर शिवीगाळ करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
सुषमा अंधारे, सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणाऱ्यांवर अद्याप कोणती कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच त्यांची हकालपट्टी देखील करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला, पण तो हल्ला गद्दारांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. भाजपच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला आहे, म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात येईल, असे वाटले होते. पण यांचा आपांपसांत गँगवॉर सुरू झाला आहे का? हा देखील एक प्रश्न आहेच, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.