‘काँग्रेस फुटणार अशीही चर्चा आहे, आता कोणावर विश्वास नाही’; अबू आझमींचं सूचक विधान
![Abu Azmi said that there is talk that Congress will split](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Abu-Azmi-780x470.jpg)
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. यानंतर राष्ट्रवादीतील नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. दरम्यान, आता काँग्रेसमध्ये देखील फुट पडणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अबू आझमी यांनी सूचक विधान केलं आहे.
अबू आझमी म्हणाले की, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे. आज विरोधी आमदारांची संख्या कमीच होती. सुरूवातीला सांगितलं गेलं की एकनाथ शिंदे जाणार आहेत. आमचा विश्वास बसला नव्हता. पण शिंदे गेले, त्यानंतर राष्ट्रवादी फुटणार अशी चर्चा होती. ते पण खोटं वाटलं होतं. पण अजित पवारच पक्ष घेऊन गेले. आता काँग्रेस फुटणार आहे अशी चर्चा आहे. कुणावरच विश्वास ठेवता येणार नाही की नेमकं काय होऊ शकतं?
हेही वाचा – World Cup 2023 साठी सज्ज होतोय जसप्रीत बुमराह, बॉलिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल
ज्या गोष्टींवर विश्वास बसत नव्हत्या, त्या काहीही भरवसा नाही त्यामुळे या राजकारणावर काय बोलायचं? त्याचप्रमाणे स्थगत प्रस्तावावर चर्चा झाली पाहिजे. सध्याच्या घडीला चित्र असं आहे की विरोधी पक्ष नेता जो जोरकसपणे विरोधकांची बाजू मांडतो तोच गेला तर मग काय करणार? विरोधी पक्षनेताच सत्तेत जाऊन बसल्यावर आता काही सांगता येणार नाही. आज विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला आहे. त्यावर चर्चा झाली पाहिजे, असं अबू आझमी म्हणाले.
आपल्या देशात विविधेतून एकता आहे. त्यामुळे समान नागरी कायदा हा देशात कसा आणता येईल? या देशात विविध धर्मांचे लोक राहतात. जर एकाच धर्माचे लोक राहात असते तर हा कायदा आणणं योग्य होतं. पण जे लोक बहुसंख्य आहेत ते अल्पसंख्य समाजाला हे दाखवू पाहात आहेत की आम्ही हे करू शकतो. मुस्लिम लोकांना आम्ही बरबाद करून आम्ही मतं घेऊ शकतो हे त्यांना दाखवायचं आहे. जर देशात वेगळ्या धर्माचे लोक आहेत तर कायदे वेगळे असलेच पाहिजेत. सध्या २०२४ ची निवडणूक जिंकायची आहे म्हणून हे सगळं चाललं आहे, असंही अबू आझमी म्हणाले.