भाजप नेत्याकडे मागितली २५ लाख रूपयांची खंडणीची मागणी
![A ransom demand of 25 lakh rupees was demanded from BJP leader Ganesh Bidkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Ganesh-Bidkar-780x470.jpg)
पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये असतानाच त्यांना एक व्हाट्सअप कॉल आला आणि शिवीगाळ करीत पॉलिटिकल करिअर खराब करून टाकण्याची धमकी देत २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे बिडकर यांनी तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
बिडकर हे गुरुवारी रात्री श्रीराम जयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते. त्यांना एका अज्ञात नंबरवरून व्हाट्सअपवर फोन आला. ‘तुला राजकीय मस्ती आली आहे. तेरे पास बहुत पैसा हो गया है. अब थोडा खर्चा कर. नाहीतर तुझी बदनामी करून तेरा पॉलिटिकल करिअर बरबाद करूँगा. तू चुपचाप २५ लाख रुपये दे. तुने पैसे नही दिया तो तू देख कैसे खेल शुरू होनेवाला है.’ असे म्हणून धमकावण्यास सुरुवात केली.
बिडकर यांनी पुण्याच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून व्हाट्सअप नंबरवरून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच माझी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने स्फुफिंग कॉल करून एका बांधकाम व्यवसायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच बिडकर यांच्या नावाने यांच्याकडे खंडणी मागण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.