breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

विधान परिषद दंगल : प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ‘ऑफर’?…वाचा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार्याने विधान परिषदेत ‘शिंदेशाही’ अवतरणार?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिंदे यांच्या बैठकीत चर्चा

चार पिढ्यांपासून लोककला जपणाऱ्या  शिंदे कुटुंबियांचा होणार सन्मान

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘अनेकांचे हिशोब चुकते’ करण्याचे व्रत हाती घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद  पवार आता आणखी एक ‘मास्टर स्ट्रोक’ लावण्याच्या तयारीत आहेत. नामवंत आणि प्रतिथयश गायक आनंद शिंदे यांना राज्यपाल नियुक्त जागेवर विधान परिषदेची ‘ऑफर’ दिली असून, याबाबत जोरदार खलबते सुरू आहेत.

कोरोना- लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच, संगीत क्षेत्रासमोरील आव्हाने या विषयांवर नामवंत गायक आनंद शिंदे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील १२ जागांच्या नियुक्तीवरुन जोरदार चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, पवार-शिंदे भेटीने चर्चेला उधाण आले आहे.

कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींमधून राज्यपाल यांच्या कोट्यातून विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती केली जाते. आता स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना संधी देत राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी वर्गाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

यापूर्वीच खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अमोल मिटकरी अशा नवोदितांना संधी देताना राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी त्या-त्या व्यक्तीचा ‘लोकाश्रय’ लक्षात घेतला आणि त्याला ‘राजाश्रय’ दिला. अशा सूचक निर्णयांमुळे आजवर ‘सरंजामी’ लोकांचा पक्ष अशी असलेली ओळख पुरसण्यासाठी शरद पवार बहुतांशी यशस्वी झाले आहेत. कारण, कोल्हे, मिटकरी किंवा शेट्टी यांची निवड योग्य असल्याबाबत समाजमनामध्ये सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे शिंदे यांना विधान परिषदेवर संधी दिल्यास त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्वागत होईल, यात तिळमात्र शंका नाही.

वंचित बहुजन आघाडीचा वचपा काढणार?

आता आनंद शिंदे यांना राष्ट्रवादीशी जोडून पवार एकप्रकारे वंचित बहुजन आघाडीचा वचपा काढण्याच्या तयारीत आहेत. कारण, शिंदे कुटुंबिय मुळचे मंगळवेढा- सोलापूर येथील आहेत. सोलापूर आणि त्या भागात वर्चस्व असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा राजकीय फायदा हा विरोधी पक्ष भाजपा होतो. दुसरीकडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी भाजपाशी युती केली आहे. दुसरीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार लोककला आणि गीतांच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचवणारे आनंद शिंदे यांच्या पाठिशी मागासवर्गीय समाज मोठ्याप्रमाणात राहील, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राष्ट्रवादीचे नेते आनंद शिंदे यांच्या  नावाला पहिली पसंती देतील. याबरोबरच शरद पवार वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना शह देण्याचा प्रयत्न करतील, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.  मात्र, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा श्री. शिंदे यांच्याकडून विधान परिषद ‘ऑफर’बाबत कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. 

आनंद शिंदेंना उमेदवारी देणे का योग्य?

आनंद शिंदे हे मराठी-हिंदीतील नामवंत पार्श्वगायक, गायक म्हणून आनंद शिंदे यांची ओळख आहे. भीम गीते व लोकगीतांसाठीही शिंदे प्रसिद्ध आहेत. प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा आनंद शिंदे यांनी जोमाने चालवला आहे. गेली ४० वर्षे त्यांनी कलेची उपासना केली आहे. त्यांचे आजोबा भगवान शिंदे हे उत्कृत पेटीवादक, तर आजी सोनाबाई तबलावादक होत्या. सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद या तीनही भावंडांनी संगीत क्षेत्राची सेवा केली आहे. प्रल्हाद शिंदे यांची मुले मिलिंद शिंदे आणि आनंद शिंदे यांची कव्वालीतील जुगलबंदी संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. आनंद आणि विजया यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श अशी तीन मुले आहेत. आदर्श हा प्रसिद्ध गायक आहे. शिंदे कुटुंबियांच्या संगीत परंपरेचा तो वारसा पुढे चालवत आहे. ‘स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून त्यांनी गरीब रुग्णांची मोफत सेवा केली आहे. राज्यपाल नियुक्त जागेसाठी सर्व निकष शिंदे पूर्ण करु शकतात. चार पिढ्या कला क्षेत्राशी संबंधित असलेल्या या कुटुंबियांतील व्यक्तीला राज्यपाल नियुक्त जागेवर संधी दिल्यास खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीकडून ‘गौरव महाराष्ट्राचा’ होणार आहे.  

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button