breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

आमची बांधिलकी ‘सिल्व्हर ओक’-‘मातोश्री’ला अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही, ‘सामना’च्या अग्रलेखाला विखेंचे प्रत्युत्तर

अहमदनगर : “आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक, तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही. आमची छाती फाडून पाहिली, तर एका वेळी एकच नेता दिसेल अन तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील” अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी ‘थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टूरटूर’ या सामनातील अग्रलेखाला प्रत्युत्तर दिलेले आहे.

‘थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टूरटूर’ या शीर्षकाखाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकात आपण माझ्यावर थेट अग्रलेख लिहिलात, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपल्याच शब्दात सांगायचे तर मी सध्या वनवासात आहे. मी राजकारणापासून दूर राहिलेलेच बरे असा सल्लाही आपण दिला आहे. फक्त जनता जनार्दनाच्या साक्षीने एवढेच सांगू इच्छीतो की मी आपल्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला, माझ्या मुलाला आणि आतापर्यंत माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम त्या जनतेशी आहे. आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक, तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय तेही लपून राहिलेले नाही” असा घणाघात विखेंनी केला आहे.

“बाळासाहेबांच्या काळात धारदार अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख असत. आजच्यासारखी लाचारी तेव्हा नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का? आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे निष्ठेने काम केले, आमची छाती फाडून पाहिली, तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो. त्यामुळेच तुम्हाला फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते हे आता लोकांना कळू लागले आहे. एकीकडे राजभवनात धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून लावून राजभवनावर कुर्निसात करायचे, हे कोलांटउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितले आहेच.” असा टोलाही राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला.

“मी भाजपमध्ये आनंदी आहे, पण महाविकास आघाडी सरकारचा एक शिल्पकार असल्याच्या अविर्भावात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावास मंत्रीदेखील करु न शकल्याचे दु:ख असेल आणि त्यातून असलेली कमालीची अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल तर त्यात माझा काय दोष? मातोश्रीविरुद्ध बंद करण्यासाठी कृष्णकुंजला कोणाची चिथावणी होती आणि कोणी वेळेवर यु-टर्न घेतले हा इतिहास अनेकांना माहिती आहेच.” असंही विखे म्हणाले.

अग्रलेखात काय?

फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता, आता ‘विखे पाटलांची कमळा’ असा चित्रपट आला अन पडला. काँग्रेसची खाट कुरकुरते की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर अँड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टूरटूर सुरु आहे, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा समाचार घेण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button