TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

बाप्पांच्या निमित्ताने राजकीय ‘गप्पा’

राष्ट्रवादीत जोर-बैठका : दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न

पिंपरी : नियमांमध्ये शिथिलता आल्याने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होताना दिसत आहे. गणेश मंडळांकडूनही सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांचा सोहळा आयोजित केला जात आहे. या सोहळ्यानिमित्त गणेश मंडळांना भेटी देऊन आपला जनसंपर्क कायम राखण्याचा प्रयत्न राज्यातील नेत्यांकडून होत आहे. गेल्या दोन दिवसांत दोन्ही राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांनी शहरात दौरे आयोजित करून गणेश मंडळे पिंजून काढली आहेत. राष्ट्रवादीसह इतरही पक्षातील नेत्यांनी सार्वजनिक आणि खासगी दौरे करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले आहे. नेत्यांच्या दौर्‍यामुळे शहरात गणेशोत्सवानिमित्त राजकीय मांदियाळी पहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणूकीनंतर पिंपरी-चिंचवडकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. मात्र राजकीय घडामोडी वेगाने बदलत असताना त्यांनी पुन्हा आपल्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात लक्ष घालायला सुरूवात केली आहे. नुकतीच त्यांनी आयुक्तांच्या उपस्थितीत अधिकार्‍यांसमवेत बैठक घेत विकासकामांचा आढावा घेतला. तसेच रविवारी (दि. 24) त्यांनी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील सर्व गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाची आरती केली. अजित पवारांनी आपला दौरा सकाळी 9 वाजल्यापासूनच सुरू केला होता. त्यांचे शहरात समर्थकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत देखील केले.

दुसरीकडे खा. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील शहरात लक्ष घालायला सुरूवात केली आहे. शनिवारी (दि. 23) त्यांनी शहरातील तब्बल 35 गणेश मंडळांना भेटी देऊन तरूणांशी संवाद साधला. रोहित पवार पहाटे तीन वाजेपर्यंत शहरातील गणेश मंडळांना भेटी देत होते. त्यामुळे त्यांच्या दौर्‍याची चर्चा रंगली आहे. याबरोबरच त्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत आपले राजकीय बस्तान शहरात बसवायला सुरूवात केल्याचे पहावयाला मिळाले.

श्री गणरायाच्या आरती आणि दर्शनासाठी राज्यातील नेते आपला मोर्चा शहराकडे वळवित असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यावरचे संकट टळू दे, असे साकडे गणरायांना घातल्याच्या प्रतिक्रिया हे नेते देत आहेत. मात्र राजकीय दृष्ट्या गणरायाच्या आशिर्वाद कौल कोणाच्या बाजूने झुकणार हे आगामी निवडणूकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

चौकट : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा खासगी दौरा –

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी (दि. 23) शहरात खासगी दौरा केला. शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमूख अ‍ॅड. सचिन भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाला त्यांनी भेटी दिल्या. तसेच मावळ जिल्हाप्रमूख माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या कार्यालयाला देखील त्यांची नियोजित भेट होती. या वेळी सार्वजनिक कार्यक्रम अथवा गणेश मंडळांच्या भेटी त्यांनी घेतल्या नसल्याची चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button