breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडकरांनो…. कोविड नियमांचे पालन करा, अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते -आयुक्त राजेश पाटील

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोनाबाधित रुग्णसंख्येचे प्रमाण कमी असले तरी कोविड संबंधित नियमांचे पालन न केल्यास गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जात असताना नागरिकांनी सर्व प्रकारची काळजी घ्यावी असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले. महापालिकेच्या थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयास आज आयुक्त राजेश पाटील यांनी भेट देऊन प्रभाग क्र.२१ आणि २३ मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

प्रभाग स्तरावरील समस्या,पावसाळी कामे,अतिक्रमण तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, कोरोना विषयक नियोजन अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीस ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्या अर्चना बारणे, उषा वाघेरे, निकिता कदम, नगरसदस्य संदीप वाघेरे, अभिषेक बारणे, स्वीकृत सदस्य संदीप गाडेकर, ग क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, देवन्ना गट्टूवार, अनिल शिंदे, सुनिल वाघुंडे, बाबासाहेब गलबले, दत्तात्रय रामगुडे, अनिल सुर्यवंशी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरुमणी, डॉ. अभय दादेवार, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू बेद, आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, नगररचना, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रभागातील कामांना गती द्यावी, रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, पदपथावरील अतिक्रमण हटवावे, पिंपरीतील जोग महाराज उद्यानाला गेट बसवावे, पॉवर हाऊस ते पिंपळे सौदागर पूलापर्यंतच्या १०० फूटी रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करावे, जिजामाता रुग्णालया जवळील अनधिकृत टप-यांवर कारवाई करावी, पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यानच्या समांतर पूलाच्या कामाला गती द्यावी, पिंपरी गावातील खेळाच्या मैदानाचे आरक्षण विकसित करावे, सुभाषनगर येथील घाट दुरुस्ती करावी, पिंपरी गावात नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी उभारावी, राधिका चौक येथील नाल्याचे काम लवकर पूर्ण करावे, लक्ष्मणनगर येथील पिण्याच्या पाण्याची टाकी कार्यान्वित करावी, चिंचवड ते थेरगाव दरम्यानचा बटरफ्लाय पूलाच्या कामाला गती द्यावी, नागरिकांना पुरेशा दाबाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, बोर्डेनगर पवारनगर पडवळनगर भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी, डांगे चौक ते काळेवाडी फाटा दरम्यान असलेल्या पदपथाचे काम पूर्ण करावे, थेरगाव रुग्णालया समोरील मोकळ्या जागेतील राडारोडा उचलावा, परिसरात साचलेला कचरा तात्काळ उचलावा आदी सूचना नगरसदस्यांनी यावेळी मांडल्या.

बैठकीत आलेल्या सूचना आणि मुद्दयांबाबत तसेच पूर्ण झालेले, चालू असलेले आणि भविष्यात हाती घेण्यात येणा-या प्रकल्पांच्या कामांबाबत आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांकडून माहिती घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावी, साचलेला कचरा वेळेत उचलावा, समस्यांचे निराकरण वेळच्या वेळी करावे असे आदेश त्यांनी अधिका-यांना दिले.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता विचारात घेता महानगरपालिकेने आवश्यक बाबींचे व्यवस्थापन करण्याचे काम सुरु केले आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने त्यांचे नियमित लसीकरण करुन घेणे अत्यंत गरजेचे आहे. महापालिकेने यासाठी मोहिम सुरु केली आहे. यामध्ये बालकांचे आणि गर्भवती मातांचे नियमित लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केलेल्यांमध्ये अॅन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत. ज्यांना कोविड संक्रमण झाले नाही अशा आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींचे शासनाने निर्धारीत केलेल्या वयोगटानुसार कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले. सुपर स्प्रेडर्सने दर १५ दिवसांनी कोरोनाची चाचणी करावी असे देखील ते म्हणाले.

प्रभाग स्तरावरील कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक, कोविड चाचणी केंद्र याबद्दल ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय दादेवार यांनी बैठकीत माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button