ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हा कसला भाऊ, हा तर ओवाळणी खाऊ !

शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे रवी राणा विरोधात रौद्ररूप

पिंपरी : महायुतीत सहभागी असलेले अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीचे रौद्ररूप मंगळवारी पिंपरीमध्ये पाहायला मिळाले. ”हा कसला भाऊ, हा तर ओवाळणी खाऊ” असे म्हणत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या प्रतिमेला जोडे मारले. ”राणा यांच्या विरोधात करायचे काय खाली डोके वर पाय” अशा घोषणांनी महिलांनी पिंपरी चौक दणाणून सोडला.

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून अमरावतीमध्ये  नुकतेच एक वक्तव्य केले, ते म्हणाले होते की “विधानसभेसाठी तुमचे आशीर्वाद द्या अन्यथा तुमच्या खात्यातून दीड हजार रुपये पुन्हा काढून घेऊ.”  या वक्तव्यानंतर राणा यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत पिंपरी येथील अहिल्याबाई होळकर पुतळ्यासमोर ”जोडे मारो” आंदोलन केले. महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे यावेळी रौद्ररूप पाहायला मिळाले. राणा यांचे वक्तव्य म्हणजे महिलांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारे आहे. रवी राणा यांच्याप्रमाणे महायुतीतील इतरही काही मंत्र्यांनी अशीच वक्तव्ये केली आहेत. योजना आणली म्हणजे महिलांवर उपकार केले का असा सवालही  यावेळी महिलांनी व्यक्त केला.

यावेळी आंदोलनात शिवसेना (ठाकरे गट) पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेविका मीनल यादव, वैशाली मराठे, अनिता तुतारे , रजनी वाघ , आशा भालेकर, सुजाता काटे, नजमा शेख , शशिकला उभे, ज्योती भालके , प्रज्ञा उतेकर, अश्विनी खंडेराव, कामिनी मिश्रा, वैशाली कुलथे, कामिनी मिश्रा, रजनी वाघ, ज्योती भालके, वैशाली काटकर, गीता कुषालकर, तस्लिम शेख, संगीता तुपके, जनाबाई गोरे, स्मिता मोगरे, कावेरी परदेशी आदी सहभागी झाल्या.

घोषणांनी पिंपरी चौक दणाणला

यावेळी महिलांनी ”ओ राणा, तुमच्या सारखा भाऊ नको. अन् तुम्ही पण नको. ”  ही कसली भेट,
ही तर धमकी आहे थेट तसेच लाडकी बहिण लाडकी नाही. ही आहे हुकुमशाही  अशा घोषणांनी पिंपरी चौक दणाणून सोडला.

राणासारख्या प्रवृत्तीला जोडे मारले

सुलभा उबाळे म्हणाल्या, अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवरून संताप जनक विधान केले आहे. या विधानामुळे तमाम भगिनींचा स्वाभिमान दुखावला गेला आहे. “विधानसभेसाठी तुमचे आशीर्वाद द्या अन्यथा तुमच्या खात्यातून दीड हजार रुपये काढून घेऊ. असे म्हणणारे राणा ही एक प्रवृत्ती आहे. खरे तर राणा यांच्या तोंडून भाजपची नीतिमत्ता समोर आली आहे. राणा यांनी आमच्या समस्त भगिनी वर्गाचा भर व्यासपीठावरून जाहीर अपमान केला आहे. राणा यांचे वक्तव्य अतिशय निंदनीय असून या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही आज राणासारख्या प्रवृत्तीला जोडे मारले आहेत.

महिलांचा संताप, म्हणाल्या दीड हजारात काय होते?

योजना जाहीर झाल्यापासून महायुतीतील अनेक मंत्री आपल्या वक्तव्यांनी आम्हा महिलांचा अपमान करत असल्याचा संताप यावेळी महिला आंदोलकांनी व्यक्त केला. ‘योजनेचे पैसे पाहिजेत तर आम्हाला मत द्या’ असे अनेक मंत्री व्यासपीठावरून सांगत आहेत.  मत नाही मिळाले तर दिलेले पैसे परत घेऊ  असे देखील म्हणत आहे. यावरून यांची नीती दिसून येत आहे. योजना जाहीर झाल्यापासून पदोपदी मुद्दा मतांपर्यंत नेऊन महायुतीतील मंत्री त्यांचे खरे रूप दाखवत आहेत. आज महागाई आभाळाला पोहोचली असून यांच्या दीड हजारात काय होते असा संताप देखील यावेळी महिलांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button