breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आम्ही पिंपरी-चिंचवडकर… ‘स्मार्ट सिटी’च्या विकासाचे शिलेदार !

  • भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या भावना
  • शहरवासीयांसह मनपा कर्मचाऱ्यांना दिल्या वर्धापन दिनी शुभेच्छा

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात योगदान देणारा प्रत्येक व्यक्ती ‘स्मार्ट सिटी’च्या यशस्वी वाटचालीचा शिलेदार आहे. त्या ज्ञात-अज्ञात सर्वांप्रति आज महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त करतो, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिका स्थापना दिवस आज (दि. ११ ऑक्टोबर) विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी शहरवासीयांसह महापालिका अधिकारी- कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महापालिका वर्धापन दिनानिमित्त आमदार लांडगे यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील स्व. अण्णासाहेब मगर पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता रामदास तांबे, भाजपा कोषाध्यक्ष सचिन तापकीर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी या चार ग्रामपंचायतीचे क्षेत्र एकत्र करून दि.४ मार्च १९७० रोजी पिंपरी-चिंचवड या नवनगराची निर्मिती करण्यात आली. डॉ. श्री. श्री. घारे हे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. गेल्या ५२ वर्षांत खेडेगाव ते अत्याधुनिक महानगर अशी या शहराने केलेली प्रगती दिमाखदार आहे.
स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पुणे शहराच्या जवळ औद्योगिक वसाहत विकसित झाली. या उद्योगांमुळे पोटापाण्यासाठी राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी या परिसरात लोकांचे लोंढे येऊ लागले. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन या परिसरात एक नवनगर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या विकासाच्या वाटचालीत औद्योगिकनगरीचे शिल्पकार म्हणून स्व. आण्णासाहेब मगर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यानंतर अवघ्या १२ वर्षांत नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले. त्यावेळी पवना नदीच्या पलिकडील भागाचाही शहरात समावेश झाला. दि. ११ ऑक्टोबर १९८२ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना करण्यात आली. हरनाम सिंग हे महापालिकेचे पहिले आयुक्त व प्रशासक होते.
दरम्यान, १९८६ च्या निवडणुकीनंतर ज्ञानेश्वर लांडगे यांना पिंपरी-चिंचवडचे पहिले महापौर होण्याचा मान मिळाला. सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव आणि वाकड या गावांचाही समावेश झाला. महापालिकेची दि. ११ सप्टेंबर १९९७ रोजी पुन्हा हद्दवाढ झाली आणि तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, दिघी, बोपखेल, दापोडी, मामुर्डी, किवळे, रावेत, पुनवळे, ताथवडे आदी गावे पालिकेत आली. सध्या एकूण २७ महसुली गावांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची हद्द आहे. या समाविष्ट गावांतील पायाभूत सुविधा सक्षम करण्याचा आमचा संकल्प आहे.

सर्वपक्षीय नेत्यांचे विकासात योगदान…
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात अमूल्य योगदान देणारे स्व. अण्णासाहेब मगर, स्व. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यासह भूमिपुत्रांनी शहराच्या विकासाची धुरा सक्षमपणे सांभाळली. तसेच, महापालिकेतील सर्व आजी-माजी अधिकारी, कर्मचारी यांनाही शहराच्या विकासाचे श्रेय द्यावे लागेल. हा विकासाचा आणि स्वाभीमानाचा वारसा आता नव्या पिढीला पुढे चालवण्याचे आव्हान सक्षमपणे पेलावे लागेल, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.


औद्योगिक नगरी, कामगार नगरी, बेस्ट सिटी, एज्युकेशन हब, स्पोर्टस सिटी, स्मार्ट सिटी अशी वाटचाल माझ्या शहराने करावी. त्यासाठी आम्ही सर्वजण सकारात्मक भूमिकेतून प्रयत्नशील आहोत. पिंपरी-चिंचवड शहराचा लौकीक आगामी काळात वाढावा. उद्योग-व्यापाराबरोबरच शिक्षण, कला, संस्कृती अशा सर्वच बाबतीत शहराची समृद्धी व्हावी. त्यामाध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाची स्मार्ट सिटी होण्याच्या दिशेने शहराची वाटचाल सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकोप्याने काम केले पाहिजे.

  • महेश लांडगे, शहराध्यक्ष व आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button