#waragainstcorona: अमेरिकेत अडकलेल्या वडिलांची ‘विनंतीपूर्ती; पोलिसांनीच साजरा केला मुलाचा वाढदिवस
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
अमेरिकेतील वडिलांनी मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबाबत ई मेल द्वारे पोलीसांना विनंती केली होती. त्या अनुषंगाने सांगवी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड तर्फे सामाजिक भान जपण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला.
वत्सल शर्मा असे वाढदिवस साजरा करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वत्सल यांचे वडील व्यवसायानिमित्त अमेरिकेत गेले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्यामुळे सध्या ते अमेरिकेतच अडकून पडले आहेत. रविवारी त्यांचा मुलगा वत्सल याचा वाढदिवस होता. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना आपल्या मुलाला शुभेच्छा देता येत नव्हत्या. यामुळे त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना ई-मेल पाठवून आपला मुलगा वत्सल यास शुभेच्छा देण्याची विनंती केली.
पोलीस आयुक्तांनी सदरचा मेसेज हा सांगवी पोलिसांना पाठविला. सांगवी पोलिसांनीही मग वत्सल याच्या वाढदिवसाची जोरदार तयारी केली. सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पोलीस पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीत असलेल्या वत्सलच्या घरी गेले. तिथे त्यांनी वत्सलच्या वडिलांचा वाढदिवसाचा मेसेज त्यास दिला. तसेच त्यास खाली पार्किंगमध्ये बोलावून पोलिसांच्या गाडीवरच केक कापत वाढदिवस साजरा केला. यावेळी सोसायटीतील नागरिकही सहभागी झाले.
अत्यंत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा झाल्याने वत्सल अक्षरशः भारावून गेला होता. त्याने आपले वडील तसेच संपूर्ण पोलीस दलाचे आभार मानले. ‘आपल्या आयुष्यातील हा वाढदिवस आपण कधीही विसरणार नाही’, अशी भावना त्याने पोलिसांशी बोलताना व्यक्त केली. सध्या या वाढदिवसाची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.