Covid 19 vaccination: 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला आजपासून सुरूवात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Corona-Vaccination-Covid-1.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
राज्य सरकारच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी तीन लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. तिन्ही लसीकरण केंद्रांवर लसीकरणाला आजपासून जोमाने सुरूवात झाली आहे.
संपूर्ण देशात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मात्र, लसीचा साठा उपलब्ध नसल्याकारणाने लसीकरण मोहीम राबविणे शक्य नसल्याचे मत राज्य सरकारने व्यक्त केले होते. मात्र, 45 वयापुढील व्यक्तींचे लसीकरण थांबवून 18 ते 44 मधील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार आजपासून पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना लस देण्यात येत आहे.
लसीकरण मोहीम राबविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरीतील नवीन भोसरी रुग्णालय, पिंपरीतील नवीन जिजामाता रुग्णालय आणि चिंचवडमधील प्रेमलोक पार्क रुग्णालयाची निवड केली आहे. याठिकाणी आजपासून सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण सुरू आहे. लसीचा साठा शिल्लक नसल्यामुळे 45 वयापुढील कोणत्याही व्यक्तीला लस मिळणार नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रावर अशा व्यक्तींनी विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन वैद्यकीय विभागाचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.