चाकणमध्ये तीन अपघातात दोघांचा मृत्यू : दोनजण जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/accident.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
चाकण परिसरात अपघाताच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. 25) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण जखमी झाले आहेत.
अपघाताची पहिली घटना 10 मे रोजी बहुळ गावच्या हद्दीत घडली. भगवान चिंतामण गायकवाड (वय 48, रा. च-होली) हे त्यांच्या कारमधून नातेवाईकांच्या लग्नासाठी जात होते. त्यांच्या कारला एका ट्रकने धडक दिली. यामध्ये भगवान गायकवाड हे जखमी झाले. तसेच त्यांच्या कारचे नुकसान झाले. याप्रकरणी ट्रक चालक सागर गंगाराम जाधव (रा. कृष्णापुरी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची दुसरी घटना 22 मे रोजी सकाळी साडेआठ वाजता खालुम्ब्रे गावात घडली. शंकर लक्ष्मण गुटूलवाड (वय 25, रा. खालुम्ब्रे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्लाउद्दिन चांद नदाफ (वय 40, रा. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादी यांचे वडील लक्ष्मण खंडूजी गुटूलवाड (वय 54) यांचा मृत्यू झाला आहे. ते त्यांच्या दुचाकीवरून जात असताना आरोपीच्या गाडीने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची तिसरी घटना 25 मे रोजी पहाटे पाच वाजता कुरुळी फाटा येथे घडली. प्रदीप बबन पिंगळे (रा. वाकी खुर्द, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात संजय अंबादास कैतके (वय 33, रा. मोशी) यांचा मृत्यू झाला आहे. तर रतन पाटील (रा. मोशी) हे जखमी झाले आहेत.
संजय कैतके हे त्यांच्या दुचाकीवरून रतन पाटील यांना घेऊन जात होते. त्यांच्या दुचाकीला आरोपीच्या ट्रकने धडक दिली. त्यात संजय यांचा मृत्यू झाला तर रतन हे गम्भी जखमी झाले आहेत. वरील तिन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.