राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये तुषार सहाणे यांचा प्रवेश
उमेदवारी निश्चित; इंद्रायणीनगर प्रभाग 8 मध्ये रंगत वाढली

तुषार सहाणे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे विरोधकांना द्यावी लागणार तगडी फाईट
पिंपरी | प्रतिनिधी
जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष तुषार सहाणे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक आठमधील रंगत वाढली आहे. सहाणे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निश्चित मानली जात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “कामाला लागा” अशा सूचना देखील या प्रवेशावेळी केल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये युवा नेते तुषार सहाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासमवेत भाजपच्या स्थायी समिती माजी अध्यक्ष सीमा सावळे, माजी नगरसेवक संजय वाबळे यांच्या पत्नी अश्विनी संजय वाबळे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले आहे. यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक आठ हे पॅनल निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या पॅनलच्या माध्यमातून विरोधकांना तगडी फाईट मिळणार आहे. त्यामुळे या प्रवेशानंतर इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक आठ चर्चेत आला आहे.
हेही वाचा : ‘अजित पवारांशी युती म्हणजे भाजपाशी हातमिळवणी’; राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीला संजय राऊतांचा विरोध
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने “काम करत आलोय काम करत राहू” असे म्हणत महाराष्ट्रात काम चालू केले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अत्यंत चांगला पाठिंबा नागरिकांकडून मिळाला. पिंपरी चिंचवड शहर हे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आजही राष्ट्रवादी काँग्रेस खास करून अजित पवार यांना मानणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात या भागात आहे. अजित पवार यांनी या शहराचा केलेला कायापालट नागरिकांच्या लक्षात आहे. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड प्रशासनातील त्यांची पकड आजही कायम ठेवली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची बलस्थाने समजली जातात.
या पार्श्वभूमीवर तुषार सहाणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. इंद्रायणी नगर हा परिसर शांत, मध्यमवर्गीय तसेच उच्च मध्यमवर्गीय असा आहे. या भागातील युवकांमध्ये उद्योजक असलेल्या तुषार सहाणे यांचा चांगला परिचय आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत तुषार सहाणे यांचा अगदी निसटता पराभव झाला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी या प्रभागात जनसंपर्क कायम ठेवला. उद्योजक म्हणून त्यांचे नेहमी युवकांना सहकार्य असते. कोरोनामध्ये त्यांनी केलेले काम आजही नागरिकांच्या लक्षात आहे. त्यामुळे या प्रभागात विरोधकांना तगडी फाईट तुषार सहाणे यांच्या विरोधात द्यावी लागणार आहे.
पिंपरी चिंचवड शहराला उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले . औद्योगिक शहर ते मेट्रोसिटी ही ओळख पिंपरी चिंचवड शहराला अजित पवार यांनीच मिळवून दिली. शहराची विकासाची ही घोडदौड कायम राहावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करण्यासाठी मी इच्छुक आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून आगामी काळात शहरांमध्ये चांगल्या प्रकारे काम करायचे आहे.
– तुषार सहाणे, युवा उद्योजक.





