“प्रशिक्षण ही प्रक्रिया नव्हे, तर विचारांना धार देणारे माध्यम” : शत्रुघ्न काटे
शत्रुघ्न काटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण महाअभियानाचा उत्साहात समारोप

पिंपरी-चिंचवड | “प्रशिक्षण ही केवळ प्रक्रिया नसून कार्यकर्त्यांच्या विचारांना धार देणारे माध्यम आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा ‘एकात्म मानववाद’ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे हेच आपले ध्येय आहे,” असे प्रतिपादन शत्रुघ्न काटे यांनी केले.
काळेवाडी येथे पार्वती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६’ अंतर्गत चिंचवड-काळेवाडी मंडळ प्रशिक्षण वर्गाचा समारोप उत्साहात पार पडला. या दोन दिवसीय प्रशिक्षणाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शत्रुघ्न काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा समारोप सोहळा झाला.
हेही वाचा : ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी एलपीजीची स्थिती; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना विचारधारेचे पाईक बनून जनसेवेसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. आजचा कार्यकर्ता तंत्रस्नेही आणि अभ्यासू असणे गरजेचे असून केवळ घोषणाबाजी न करता शासनाच्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने सेवाभावाने काम केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. “काळेवाडी मंडळातील प्रत्येक कार्यकर्त्याने ‘मै भी पन्ना प्रमुख’ या जिद्दीने कामाला लागावे,” असेही त्यांनी नमूद केले.
या प्रशिक्षणात पक्षाची ध्येयधोरणे, अंत्योदय संकल्पना आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ सक्षमीकरण या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार शंकर जगताप, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, मधुकरभाऊ बच्चे, ऍड. हर्षदभाऊ नढे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी महापालिका आणि इतर निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा अधिक बळकट करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने ‘मै भी पन्ना प्रमुख’ या जिद्दीने काम केले तरच आगामी महापालिका आणि इतर निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा अधिक मजबुतीने फडकेल. सेवा ही केवळ कर्तव्य नाही, तर जनतेपर्यंत विचार आणि योजनांचा प्रवेश करुन देण्याचा मार्ग आहे.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.





