‘ट्राफिक बडी’मुळे बेशिस्तांवर ‘‘अंकुश’’
वाहतूक सक्षमीकरणाला मदत: पिंपरी-चिंचवडमध्ये ९ हजार ८७२ तक्रारींची नोंद

पिंपरी-चिंचवड | शहरातील रस्त्यांवर वाहतूक पोलिस नसले तरी बेशिस्त वाहनचालकांना आता मोकळे रान मिळणार नाही. सजग नागरिक थेट व्हॉट्सॲपद्वारे वाहतूक नियमभंगाची तक्रार पोलिसांकडे करू शकतात. पिंपरी-चिंचवड पोलिस यांच्या वाहतूक शाखेने सुरू केलेल्या ‘ट्राफिक बडी’ या व्हॉट्सॲप चॅटबॉट प्रणालीमुळे हे शक्य झाले आहे. आतापर्यंत या प्रणालीवर एकूण ९ हजार ८७२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
१७ जुलै २०२५ रोजी सुरू झालेली ही सुविधा आता पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. नागरिकांनी ८७८८६४९८८५ या क्रमांकावर ‘हाय’ किंवा ‘हॅलो’ असा संदेश पाठविल्यानंतर चॅटबॉट विविध पर्याय उपलब्ध करून देतो. तक्रार नोंदविताना फोटो, व्हिडीओ आणि लोकेशन शेअर करणे आवश्यक आहे. तक्रारीनंतर संबंधित आयडी देण्यात येतो आणि कारवाईबाबत अद्ययावत माहिती पाठवली जाते. या सेवेसाठी स्वतंत्र ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही.
स्थान-आधारित प्रणालीमुळे खोट्या तक्रारींना आळा
‘ट्राफिक बडी’ ही स्थान-आधारित (लोकेशन-बेस्ड) प्रणाली असल्याने तक्रारदाराच्या ठिकाणाची पडताळणी केली जाते. त्यामुळे खोट्या किंवा अपूर्ण तक्रारी टाळण्यास मदत होते. घटनास्थळी उपस्थिती नसल्यास किंवा पुरावा (फोटो/व्हिडीओ) उपलब्ध नसल्यास तक्रार नामंजूर केली जाते. आतापर्यंत १ हजार ८५५ तक्रारी नामंजूर करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा
कोणत्या तक्रारी करता येतात?
वाहतूक कोंडी, सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे, अवैध पार्किंग, रस्त्यावरचे अडथळे तसेच सुरक्षा-संबंधित मुद्द्यांबाबत तक्रार नोंदविता येते. मात्र गुन्हेगारी किंवा इतर स्वरूपाच्या तक्रारी या प्रणालीत स्वीकारल्या जात नाहीत.
रस्त्यांच्या तक्रारी महापालिकेकडे वर्ग
खड्डे, खराब रस्ते किंवा दुरुस्ती-संबंधित तक्रारी ‘ट्राफिक बडी’द्वारे स्वीकारून त्या पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्याकडे वर्ग केल्या जातात. पोलिस आणि महापालिका यांच्यात समन्वय साधून आवश्यक ती दुरुस्ती केली जाते. समस्या न सुटल्यास मासिक आढावा घेतला जातो. रस्त्यांबाबत आतापर्यंत ३२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणारी ही राज्यातील पहिली स्थान-आधारित योजना असल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले. सजग नागरिकांनी या सुविधेचा सक्रिय वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
“‘ट्राफिक बडी’ ही केवळ तक्रार नोंदविण्याची सुविधा नसून नागरिक आणि वाहतूक पोलिस यांच्यातील थेट दुवा आहे. स्थान-आधारित प्रणालीमुळे खोट्या तक्रारींना आळा बसतो आणि प्रत्यक्ष घटनास्थळी झालेल्या नियमभंगावर तत्काळ कारवाई करता येते. नागरिकांनी सजग राहून फोटो, व्हिडीओ आणि अचूक लोकेशनसह तक्रारी नोंदविल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होण्यास निश्चितच मदत होईल.”
– विवेक पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग.




