Katraj Bypass Accident : कात्रजच्या ‘डेथ ट्रॅप’वर मृत्यूचं थैमान!
अनियंत्रित डंपरने ८ वाहनांना उडवलं; भीषण धडकेनंतर डंपर जळून खाक, प्रवासी थोडक्यात बचावले

पुणे | पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज बाह्यवळण रस्ता (Katraj Bypass) पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला असून हा परिसर जणू ‘डेथ ट्रॅप’ बनला आहे. बुधवारी सायंकाळी खडीने भरलेल्या एका भरधाव डंपरने नियंत्रण सुटल्यामुळे तब्बल ८ वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. (Katraj Bypass accident) हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर काही क्षणांतच डंपरने भीषण पेट घेतला आणि तो पाहता-पाहता आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सुदैवाने, या थरारक घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, ४ ते ५ प्रवासी गंभीर जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, हा डंपर (क्रमांक MH12 WJ 6916) नवीन कात्रज बोगद्याकडून नवले पुलाच्या दिशेने जात होता. जांभुळवाडी बोगद्याजवळ चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोर असलेल्या कार व एसयूव्हीसह ८ वाहनांना अक्षरशः चिरडत नेले. वाहनांना उडवल्यानंतर सुमारे ३०० मीटर पुढे गेल्यावर डंपरच्या मागील बाजूने अचानक पेट घेतला. टायरचा घर्षणामुळे किंवा इंजिनमधील बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीचे लोट इतके उंच होते की महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
हेही वाचा : गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा आमदार महेश लांडगे यांना दिव्य आशिर्वाद!
वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यातील ४ ते ५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले आहे. जांभूळवाडी बोगदा ते नवले पूल हा पट्टा (Katraj Bypass accident) आता अपघातांचे केंद्र बनला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये संतापाची लाट असून, प्रशासनाने येथे कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.




