पादचारी नागरिकांच्या हातातील मोबाईल पळवण्याच्या तीन घटना उघड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Mobile-snatching.jpg)
पिंपरी चिंचवड | चिखलीतून तीन नागरिकांच्या हातातील मोबाइल जबरदस्तीने हिसकावून नेले. याप्रकरणी शनिवारी (दि. 21) चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.जबरी चोरीच्या पहिल्या गुन्ह्यात शुभांगी दादासाहेब गाढवे (वय 22, रा. शरदनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी गाढवे या 2 मार्च रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास कामाला जाण्यासाठी स्पाइन रोड येथे आल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी शुभांगी यांच्याकडील आठ हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावून नेला.
दुसऱ्या गुन्ह्यात गणेश मारूती पाटील (वय 22, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी पाटील हे 17 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास शकुन हॉस्पिटल चौक, संभाजीनगर येथून मोबाइलवरून बोलत पायी चालत घरी चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील 17 हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावून नेला.तिसऱ्या घटनेत हमीदउल्ला मकबूल खान (वय 19, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी खान हे शनिवारी (दि. 21) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कुदळवाडी येथे मोबाइलवर बोलत उभे होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील 12 हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावून नेला. वरील तीनही गुन्ह्यांचा तपास चिखली पोलीस करीत आहेत.