बेकायदेशीर तीन तलाक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
![Three have been charged in three illegal divorce cases](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Triple_-e1628405432156.jpg)
पिंपरी चिंचवड | माहेरहून हुंड्यापोटी पैसे आणि कार न दिल्याच्या कारणावरून पती, सासू आणि सासरे या तिघांनी मिळून विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहितेला तीन तलाकची नोटीस पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 22 डिसेंबर 2018 पासून एप्रिल 2021 या कालावधीत भोपुरारोड, साहिबाबाद, गाजियाबाद, उत्तर प्रदेश येथे घडल.
पती शोएब अथर सिद्दिकी (वय 36), सासरे अथर सिद्दिकी (वय 72), सासू (वय 65, सर्व रा. भोपुरारोड, साहिबाबाद, गाजियाबाद, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 7) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता आणि आरोपी शोएब यांचे मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे लग्न झाले होते. त्यानंतर आरोपींनी विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. सासू-सासर्यांनी विवाहितेची हुंड्यासाठी छळवणूक केली. पैसे, चारचाकी वाहन न दिल्याने पतीने विवाहितेला तीन तलाकची नोटीस पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. तसेच विवाहितेचे स्त्रीधन परत केले नाही.
याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 498 (अ), 504, 506, 34, मुस्लिम महिला हक्क संरक्षण कायदा 2019 चे कलम 3, 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.