Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तृतीयपंथीयांना समाजाचा एक घटक समजून सन्मान दिला पाहिजे ; महापौर उषा ढोरे यांचे प्रतिपादन

  • रोजगार मिळवून देण्यासाठी तृतीयपंथीयांसाठी “अर्धनारी नटेश्वर” फॅशन शोचे आयोजन

पिंपरी – तृतीयपंथीयांना कोणताही रोजगार मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव टाळ्या वाजवत रस्त्यावर भीक मागून जगावे लागते. त्यांना समाजात सन्मान मिळण्यासाठी तसेच, स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम स्वागतार्ह आहे. त्या घटकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून समाजाचा एक घटक म्हणून सन्मानाने पाहिले पाहिजे, असे मत  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी मंगळवारी (दि.14) व्यक्त केले.

तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदण्यासाठी फोर फॉक्स प्रॉडक्शनच्या वतीने ‘अर्धनारी नटेश्वर’ आणि ‘मिस अ‍ॅण्ड मिसेस व्हिजन महाराष्ट्र प्रेजेंट’ कार्यक्रमाचे पुण्यात 23 सप्टेंबरला आयोजन केले आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत महापौर उषा ढोरे बोलत होत्या. त्यांच्या हस्ते फॅशन शोमधील विजेत्यांसाठी असलेल्या आकर्षक क्रॉऊनचे अनावरण करण्यात आले.

या वेळी फोर फॉक्स प्रॉडक्शनचे संस्थापक संचालक माहीर करंजकर, के. सी. चौधरी, महेश चरवड, शर्वरी गावंडे, लेखिका सोनल गोडबोले, सहारा प्रॉडक्शन हाऊसचे संस्थापक संचालक डॉ. राजेंद्र भवाळकर, अखिल भारतीय जाणीव संघटनेचे आनंद पायाळ, पूनम मिश्रा, गौरव मण्डल, रवी कदम, पुणेरी प्राईड फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रेरणा वाघेला, बिईंग वूमनच्या संचालिका रोहिणी वांजपे, शुभांगी नांदूरकर व प्रसिद्ध अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेत्री गौरी कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.

महापौर म्हणाल्या की, तृतीयपंथीयांना टाळी वाजवत भीक मागणे किंवा रात्रीच्या वेळी रस्त्यांवर उभे राहू लागू नये म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यास महापालिकेच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. तृतीयपंथीयांना वेगळे न समजता, त्यांना सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे. त्या घटकांसाठी महापालिकेच्या कल्याणकारी योजना आहेत. त्या त्यांच्यापर्यंत पोहचविल्या जात आहेत. तसेच, त्या वर्गासाठी अर्थसंकल्पात भरीत तरतूद केली जाईल, अशी ग्वाही महापौर उषा ढोरे यांनी दिली.

माहीर करंजकर यांनी सांगितले की, फॅशन शोमध्ये महाराष्ट्रातून 10 टॉप तृतीयपंथी थीम मॉडल्स सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडून कोणतेही प्रवेश शुल्क घेण्यात येणार नाही. तृतीयपंथीयांना रोजगाराची संधी आणि समाजात स्थान मिळण्याच्या दृष्टीने तसेच, ते स्वबळावर उभे राहावेत म्हणून  या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या घटकाला समाजात स्थान निर्माण व्हावे म्हणून त्यांना नोकरी, स्किल डेव्हलपमेंट, ट्रेनिंग तसेच, व्यवसाय उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे समाजामध्ये तृतीयपंथीयांमध्ये जनजागृती निर्माण होईल आणि समाजामध्ये तृतीयपंथीयांना एक प्रकारचा न्याय मिळेल. शोमधील विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजन फोर फॉक्स प्रोडक्शनचे संस्थापक महिर करंजकर, संचालक के. एस. चौधरी, शर्वरी गावंडे, महेश चरवड यांनी केले आहे. फॅशन शोचे डायरेक्शन योगिता गोसावी, किरण सोनटक्के, पूनम मिश्रा, गौरव मंडल, अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके व अभिनेत्री गौरी कुलकर्णी यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी सहारा प्रॉडक्शनचे डॉ. राजेंद्र भवाळकर, लेखिका सोनल गोडबोले, मीडिया सोलुशनच्या रोहिणी वांजपे, रवी कदम, अखिल भारतीय जाणीव संघटनेच्या अध्यक्षा फुलचंद पायल, पुणेरी प्राईडच्या अध्यक्ष मयुरी बनसोड, प्रेरणा वाघेला यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

तृतीयपंथीयांच्या रोजगारासाठी ‘द सुपर स्टोअर’ची निर्मिती
लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील लोकांच्या रोजीरोटीवर आलेले संकट आपण सर्वजण जाणत आहोतच. या पार्श्वभूमीवर फोर फॉक्स प्रोडक्शनच्या वतीने त्यांना मोलाचे सहकार्य होणार आहे. तृतीयपंथीसाठी ’द सुपर स्टोअर’च्या माध्यमातून त्यांना नोकरी किंवा व्यवसाय उपलब्ध करून दिला जाणार आहे. या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगाराची संकल्पना प्रत्यक्षात आखली जाणार आहे. केवळ समाजापासून तुटलेल्या घटकांना प्रवाहात आणण्यासह, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून ही सुरुवात आहे. इतरांनाही त्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे माहिर करंजकर यांनी सांगितले.

समाजात समलैंगिक, तृतीयपंथीयांना अनेकदा हीन वागणूक दिली जाते. तृतीयपंथीयांना सिग्नलवर व लोकलमध्ये भीक मागावी लागते. त्यापेक्षा त्यांना चांगले मानाचे स्थान मिळावे यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. आपण संस्कृतीच्या नावाखाली अनेकदा वैज्ञानिक वास्तवापासूनही दूर जातो, याचा परिणाम म्हणून अनेकदा समाजातील एखादा घटक वंचित राहाण्याचा धोका असतो. तृतीयपंथीयांच्या बाबतीत असेच झाले आहे. तृतीयपंथीयांना आपण वाळीत टाकल्यासारखे समाजापासून दूर ठेवले होते. त्यांना फोर फॉक्स प्रॉडक्शनच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे माहिर करंजकर आणि त्यांच्या टीमने स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button