breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात चोरट्यांचा सुळसुळाट

  • चोरीच्या 10 घटनांमध्ये साडेदहा लाखांचा मुद्देमाल चोरीला

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या चोरीच्या आणखी 10 घटना उघडकीस आल्या आहेत. या 10 घटनांमध्ये 10 लाख 46 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

चोरीच्या 10 घटनांमध्ये चार दुचाकी चोरीच्या घटना आहेत. दुचाकी चोरीच्या पहिल्या प्रकरणात राहूल हनुमंत येवले (वय 28, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोमवारी (दि. 29) रात्री साडेआठ ते पावणे अकरा वाजताच्या दरम्यान राहुल यांची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथून चोरून नेली.

दुचाकी चोरीच्या दुसऱ्या प्रकरणात संजय तुकाराम यादव (वय 40, रा. गवळीमाथा, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी संजय यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी सोमवारी रात्री साडेनऊ ते मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान राहत्या घराजवळून चोरून नेली.

वाहन चोरीच्या तिसऱ्या प्रकरणात पवन अनिल परदेशी (वय 45, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पवन यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी 24 नाव्हेंबर रोजी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास राहत्या घराजवळून चोरून नेली.

वाहन चोरीच्या चौथ्या प्रकरणात प्रितेश जगदीश इंदानी (वय 29, रा. सूसगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रितेश यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी सोमवारी रात्री बारा ते मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान निया अपार्टमेंट या इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली.

नवीन ज्ञानेश्‍वर भालेकर (वय 43, रा. टॉवर लाइन रोड, तळवडे) यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील उचकटून चोरट्याने एक लाख 44 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 29) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

समीर भगवान जगदाळे (वय 33, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर यांच्या पत्नी सोमवारी (दि. 29) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दूध आणण्यासाठी बाहेर गेल्या. दूध घेऊन घरी येईपर्यंत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 16 हजार 200 रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे उघडकीस आले.

आकुर्डी येथे सोमवारी (दि. 29) सायंकाळी रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका वृद्धाच्या तोंडावर मिरची पावडर टाकून एका चोरट्याने वृद्धाला लुटले. कवडू विठोबा थूल (वय 68, रा. धृवदर्शन हाऊसिंग सोसायटी, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या एका वृद्ध भक्ताला दोन चोरट्यांनी धक्का देऊन खाली पाडले आणि गळ्यातील दोन लाख 40 हजार रुपये किमतीची सोनसाखळी पळवली. तसेच एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपयांची बोरमाळ त्याच चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 30) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडला. दत्तात्रय सिताराम खोकराळे (वय 61, रा. खामुंडी सोमनाथ नगर, ता. जुन्नर) यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कासारवाडी येथून महिला बसने निगडी येथे आली. निगडी बस स्टॉपवर लोणावळा येथे जाणाऱ्या बसमध्ये चढण्यासाठी रांगेत उभी असताना तिच्या बॅग मधून तीन लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 30) सकाळी घडली. याप्रकरणी 55 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बावधन खुर्द येथील द शॅक हॉटेल मध्ये चोरी करताना दोघेजण सापडले. अभिजित साधू ठोंबरे (वय 20, रा. तळजाई पद्मावती, पुणे), जयमलसिंग भगवानसिंग सौंते (वय 40, रा. चांदणी चौक, बावधन) अशी चोरी करताना सापडलेल्यांची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी अभिजित राजेंद्र दगडे (वय 30, रा. बावधन बुद्रुक) यांच्या हॉटेलमधून तीन व्यावसायिक फ्रीज, लोखंडी टेबल, भांडी, गॅस सिलेंडर, गॅस शेगडी असे एक लाख 51 हजारांचे साहित्य आरोपी चोरून नेत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button