पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भिंती सजल्या विद्यार्थ्यांच्या चित्रांनी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असणाऱ्या जिन्याच्या भिंती विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांनी सजल्या आहेत. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी या चित्रांची पाहणी करीत विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे व असा अनोखा उपक्रम राबवल्याबद्दल शिक्षण विभागाचे कौतुक केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने नुकतीच ‘कॅनव्हास ऑफ क्युरिऑसिटी’ हा चित्रकला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात आकांक्षा फौंडेशनच्या पाच शाळांसह महानगरपालिकेच्या ३४ शाळांनी सहभाग घेतला होता. चित्रकला मेळाव्यात २९० विद्यार्थ्यानी ४० शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध चित्रांचे रेखांटन केले.
हेही वाचा – सायबर चोरट्यांनी बनविले पीएमपीचे हुबेहुब ॲप!
विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी विविध विषय तसेच चित्रकलेचे साहित्य देण्यात आले होते. यामध्ये ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी ‘माझे गाव, माझे विश्व’, ‘विविधतेतील एकता’, ‘परंपरा आणि आधुनिकता’ यांसारख्या विषयांवर कल्पक चित्रे साकारली. यामधील उत्कृष्ट चित्र महानगरपालिकेच्या जिन्यातील भिंतीवर लावण्यात आली आहेत. या चित्राची पाहणी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी करीत विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भिंतीवर लावण्यात आलेली विद्यार्थ्यांची चित्र ही विविध सामाजिक संदेश देणारी आहेत. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांमध्ये त्यांच्यातील रंगसंगतीचे भान, विषयाचे सादरीकरण करण्याची कला, सर्जनशीलता दिसून येत असून शिक्षण विभागाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका