पुनावळे डंपिंग यार्ड हटवण्याची चळवळ ठरली ऐतिहासिक; सुमन ढवळे
नागरिकांच्या एकजुटीने आरोग्यदायी पुनावळ्याचा मार्ग मोकळा

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–२०२६च्या पार्श्वभूमीवर पुनावळे, वाकड आणि ताथवडे परिसरातील सामाजिक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. पुनावळे ही केवळ भौगोलिक जागा नसून अनेकांसाठी ती जन्मभूमी आणि ओळखीचा भाग आहे. याच भावनेतून पुनावळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या अधिरा इंटरनॅशनल स्कुलच्या डायरेक्टर सुमन नवनाथ ढवळे आणि नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखाली झालेली डंपिंग यार्ड हटवण्याची चळवळ शहरातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
पुनावळ्यातील कचरा डंपिंग यार्ड हा प्रश्न फक्त कचऱ्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो नागरिकांच्या आरोग्य, पर्यावरण आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेशी निगडित होता. या गंभीर समस्येविरोधात लोकांना सोबत घेत लोकशक्तीची व्यापक चळवळ उभी राहिली. नागरिकांच्या एकजुटीच्या आणि ठाम आवाजामुळे अखेर कचरा डेपो कायमस्वरूपी हटवण्यात यश आले, तसेच त्या जागेचे आरक्षणही रद्द करण्यात आले. या ऐतिहासिक आंदोलनाची सुरुवात स्थानिक पातळीवरून झाली आणि जनतेच्या पाठबळामुळे ते यशस्वी झाले.
भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या ढवळे दाम्पत्याने केवळ आंदोलनापुरतेच नव्हे, तर दैनंदिन नागरी समस्या सोडवण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी स्वखर्चातून ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याचा उपक्रम राबवण्यात आला. तसेच पुनावळे–वाकड–ताथवडे परिसरात जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या तक्रारी आणि प्रश्न मार्गी लावण्यात आले.
हेही वाचा : महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी; राज्य निवडणूक आयुक्त
प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे स्वखर्चातून डांबरीकरण, मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन, तसेच क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी अटल करंडक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. अधिरा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून आधार कार्ड, मतदार नोंदणी, पालक मेळावे घेऊन १० हजारांहून अधिक पालकांशी थेट संवाद साधण्यात आला.
येणाऱ्या काळात पुनावळे–वाकड–ताथवडे परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुसंस्कृत जीवनमान देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार सुमन ढवळे यांनी व्यक्त केला आहे. “हा प्रवास एकट्याचा नाही, तो सर्व नागरिकांचा आहे. आपल्या हक्कांसाठी आणि भविष्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी, लोकसहभाग आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर परिसराच्या विकासाचा हा प्रवास अधिक व्यापक होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




