पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा ‘ऑफलाइन’ होणार
![The general meeting of Pimpri Chinchwad Municipal Corporation will be held offline](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/pcmc-7.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
ब्रेक द चेन मोहीमेतंर्गत राज्य सरकारने निर्बंध शिथील करत महाराष्ट्रात पाच टप्प्यात अनलाॅक जाहीर केला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आॅनलाईन सभा बंद होवून सर्वसाधारण सभा देखील सभागृहात 50 टक्के नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यामुळे जून महिन्याची सर्वसाधारण सभा आॅफलाईन घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानुसार बैठका, सभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वसाधारण सभा 50 टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी दिली आहे. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनीही आदेश पारित केले आहेत. राज्य सरकारने कोरोनामुळे सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात घेण्यासाठी मनाई केली होती. त्यामुळे महापौर, आयुक्त, पदाधिकारी, गटनेते, ज्येष्ठ नगरसेवक सभागृहातून तर बाकीचे नगरसेवक, अधिकारी ऑनलाइन सभा कामकाजात सहभागी होत असत. त्यानुसार पिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभा पार पडत होत्या
मे महिन्याची सर्वसाधारण सभा महापौर कक्षातून ऑनलाइन घेतली. पदाधिकारी, गटनेते त्यांच्या केबिनमधून, काही नगरसेवक स्थायी समिती सभागृहातून तर, काही नगरसेवक आपल्या घरुन ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ द्वारे सभेत सहभागी झाले होते. सभाकामकाज करताना अनेक तांत्रिक अडचणी आल्या. आता राज्य सरकारने ऑफलाइन सभा घेण्यास परवानगी दिली आहे. महापालिकेला राज्य सरकारचे पत्र प्राप्त झाले असून, त्यामध्ये 50 टक्के क्षमतेने प्रत्यक्ष सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत प्रभारी अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, “ महापालिका सभागृहातून प्रत्यक्षात सर्वसाधारण सभा घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. सभागृहाच्या क्षमतेनुसार सभागृहात उपस्थितीबाबत सदस्यसंख्या निश्चित करण्यात येणार आहे. 50 टक्के उपस्थितीत जून महिन्याची सभा होईल. उर्वरित नगरसेवक ऑनलाइन सभा कामकाजात सहभागी होतील”.