घरफोडी करून पाच जिवंत काडतूसासह पिस्तूल पळवले
![The burglars snatched a pistol with five live cartridges](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/ROBBERY.jpg)
पिंपरी चिंचवड | अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी गणेशनगर, बोपखेल येथे उघडकीस आली.
शिवाजी गंगाराम शिंदे (वय 56, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी सात वाजताच्या कालावधीत घडला. अज्ञात चोरट्याने फिर्यादी शिंदे यांच्या घराच्या गेट आणि दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील बेडरूम मधील लाकडी कपाटातून एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, रोख रक्कम, तीनशे एक ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि घड्याळ असा एकूण सात लाख 32 हजार 720 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.