सुलक्षणा शिलवंत- धर यांची SRA आणि शहरविकासाबाबत ठाम भूमिका
मिशन- PCMC : राष्ट्रवादीच्या ‘‘तुतारीला’’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 20, संत तुकाराम नगर येथून सुलक्षणा शिलवंत धर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ‘‘तुतारी’’ चिन्हावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, सामान्य नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
घरांच्या पुनर्विकासावरून त्या म्हणाल्या, “SRA म्हणजे फक्त घरांचा प्रश्न नाही, तो संमती, विश्वास आणि न्यायाचा प्रश्न आहे. दबावाने घेतलेली संमती नव्हे; बहुसंख्य लोकांच्या विश्वासातूनच SRA उभं राहायला हवं.” त्या म्हणाल्या की घर ही दया नव्हे, तर गरीबांचा हक्क आहे. “ज्यांचा हक्क आहे, तेच घर मिळवणार. ही लढाई इथेच थांबणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
हेही वाचा : सुरेश तात्या म्हेत्रे यांचे प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुभवी नेतृत्व!
घर विकताना नागरिकांना दिलेली स्वप्नं फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात येण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. थेट रस्ता, स्वच्छ हवा आणि सुरक्षित परिसर ही लक्झरी नव्हे, तर नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, असे डॉ. शिलवंत धर यांनी सांगितले. त्यांनी जोर देऊन म्हटले, “विकास म्हणजे इमारती नव्हे, सन्मानाचं जगणं. हेच माझं वचन.”
फेरीवाल्यांबाबतच्या परिस्थितीवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “आम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात नाही; अव्यवस्थेच्या विरोधात आहोत. Organised Hawker Zone म्हणजे फेरीवाल्यांना सन्मानाची जागा आणि नागरिकांसाठी मोकळे रस्ते,” असे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर, शहरातील साफसफाई आणि पायाभूत सुविधा सुधारणेबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. “तात्पुरती साफसफाई नव्हे; मूळ समस्येवर कायमचा उपाय हवा. ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाईन्स लोकसंख्येनुसार मजबूत केल्या जातील, जेणेकरून चोकअप होणार नाही आणि सुरक्षित निचरा मिळेल,” असे डॉ. शिलवंत धर म्हणाल्या. शहर विकासाच्या दृष्टिकोनातून त्या म्हणाल्या, “विकास म्हणजे मलमपट्टी नाही, कायमचा दिलासा. व्यवस्थित शहर, सुरक्षित रोजगार आणि सर्वांसाठी दिलासा – हेच माझं ध्येय आहे.”
घर ही दया नाही, हक्क आहे; सुरक्षित रस्ता, स्वच्छ हवा आणि सन्मानाचं जीवन हे प्रत्येक नागरिकासाठी न थांबणारा हक्क आहे. विकास म्हणजे केवळ इमारती नव्हेत, तर कायमचा दिलासा आणि समान संधी.
– सुलक्षणा शिलवंत-धर, उमेदवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, प्रभाग- क्रमांक- 20.




