ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे प्रतिपादन, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्यावतीने विद्यार्थी सुरक्षा- संवाद सत्र उपक्रम उत्साहात

पिंपरीः शाळांमध्ये भविष्यातील सुजाण नागरिक घडत असतात. विद्यार्थ्यांची सुरक्षा हा विषय खूप संवेदनशील असून त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सर्वांनी जबाबदारी घेणे आवश्यक असून याबाबत शहरातील सर्व शाळांमध्ये सर्वांनी अत्यंत सजग राहून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांच्यासह महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय देखील महत्वाचा आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शहरातील महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील तसेच खासगी शाळांतील सर्व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत विद्यार्थी सुरक्षा- संवाद सत्राचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी उपस्थितांसमवेत संवाद साधताना आयुक्त सिंह बोलत होते.

या संवादसत्रास पद्मश्री गिरीश प्रभुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, अतिरिक्त वाहतूक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार खोराटे, पंकज पाटील, प्रशासन अधिकारी संगिता बांगर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, माध्यमिक प्रशासन अधिकारी राजीव घुले, माध्यमिक शिक्षण अधिकारी बुधा नाडेकर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्य समितीच्या जिल्हा सल्लागार डॉ.जयश्री सारस्वत , अर्पण संस्थेच्या प्रतिनिधी नीलम परब, मुस्कान फाऊंडेशनच्या प्रतिनिधी मनिषा कांबळे तसेच महापालिका, खासगी शाळांचे मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक आणि शिक्षक उपस्थित होते.

अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, कोणाचेही लहान मुल असले तरी त्याची सुरक्षितता ही प्राथमिकता असायला हवी. बऱ्याचवेळा शाळेतील विद्यार्थी झालेल्या शोषणाबद्दल घरी सांगायला घाबरतात. अशावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक किंवा शाळा व्यवस्थापन समिती यांची जबाबदारी व भूमिका खुप महत्वाची आहे. मुलाचे लैंगिक शोषण झालेले असल्यास त्याची तक्रार पोलीसांपर्यंत जाणेही खुप महत्वाचे आहे. तसेच शाळेमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करून मुलांच्या तक्रारींचे निवारण करणे किंवा त्यांना विश्वासात घेऊन त्यांना मानसिक आधार देणेही गरजेचे आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरात ठिकठिकाणी दामिनी पथकांचीही नेमणूक करण्यात आली असून विविध शाळांना हे भेटी देत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत असणाऱ्या अडचणी सोडविण्याबाबत हे पथक युद्धपातळीवर काम करत आहे. कोणत्याही महिलेला कोणत्याही क्षणी असुरक्षित वाटल्यास तिने दामिनी पथकाला संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच दामिनी पथकाद्वारे पिंपरी चिंचवड परिसरातील शाळा, महाविद्यालये तसेच हौसिंग सोसायटीच्या आवारात पाचारण करण्यात आले आहे. यामुळे दामिनी पथकातील महिलांचा त्या त्या परिसरातील महिलांशी किंवा शाळा, महाविद्यालयातील मुलांशी संपर्क वाढण्यास मदत मिळणार आहे. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक प्राचार्य यांनीही दामिनी पथकाला सहकार्य करणे गरजेचे असून दामिनी पथक शाळेमध्ये पाहणीसाठी आल्यास त्यांची अडवणूक करू नये, असेही परदेशी यावेळी म्हणाले.

शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे शाळा सुरक्षा लेखापरीक्षण बाबत माहिती दिली. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये शाळा सुरक्षा लेखापरीक्षण यशस्वीरित्या पार पडले असून शहरातील खाजगी शाळांनी याची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. शाळांतील भौतिक सुरक्षेमध्ये शाळेची इमारत, अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षा,भूकंप प्रतिबंध, शौचालय, चेतावणी प्रणाली आणि निर्वासन, पिण्याचे पाणी, प्रयोगशाळा सुरक्षा, मध्यान्ह भोजन, क्रीडा सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षितता आदी गोष्टींचा समावेश असून भावनिक आणि वैयक्तिक सुरक्षेमध्ये अपंगत्व समर्थन, वैद्यकीय सहाय्य आणि प्रथमोपचार, आघात व्यवस्थापन, बाल लैंगिक अत्याचार, सामाजिक व भावनिक अत्याचार, सायबर सुरक्षा आदी बाबींचा यात समावेश असल्याचे थोरात यांनी सांगितले.

शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी विद्यार्थी सुरक्षेबाबतचा शासन निर्णय, शालेय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रार पेटी, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर सत्र याबद्दल संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. दरम्यान, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्य समितीच्या जिल्हा सल्लागार डॉ.जयश्री सारस्वत यांनी शाळा परिसरात व्यसनास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनांची माहिती दिली. अर्पण संस्थेच्या प्रतिनिधी नीलम परब आणि मुस्कान फाऊंडेशनच्या प्रतिनिधी मनिषा कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृतीपर माहिती दिली. या संवाद सत्राच्या उत्तरार्धात उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती प्रतिनिधी यांनी आपल्या शंका उपस्थित केल्या आणि या शंकांचे निरसन महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील तसेच पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी केले. उपस्थितांचे आभार सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी मानले, प्रास्ताविक प्रशासन अधिकारी संगिता बांगर यांनी तर सुत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले.

प्रतिक्रिया


विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. आवश्यक ठिकाणी सी.सी.टी.व्ही. बसविण्यात येऊन त्याबाबत आवश्यक जबाबदारी संबंधित शाळेने घ्यावी. शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने पालकांसमवेत संवाद सत्राचे आयोजन करावे. शाळांतील शिक्षकांसमवेत शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशिक्षण द्यावे. विद्यार्थ्यांना ‘गुड टच आणि बॅड टच’ बाबत अवगत करावे. शाळेमध्ये वावरताना विद्यार्थ्यांच्या मनात सुरक्षितेतची भावना निर्माण व्हावी, अशा प्रकारचे पोषक वातावरण शाळेत निर्माण करावे. काही वेळा विद्यार्थी भीतीमुळे व्यक्त होत नाहीत त्यामुळे शाळेत समुपदेशकांची नियुक्ती करणेही गरजेचे आहे. समुपदेशकांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यास तसेच त्या समस्यांवर तोडगा काढण्यास मदत होत असते. विद्यार्थ्यांना तक्रारी करण्यासाठी शाळेत तक्रार पेटीची व्यवस्था करणे आवश्यक आहे. शाळांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शहरातील सर्व शाळांमध्ये कोअर कमिटी स्थापन करून त्यासंदर्भात आवश्यक मापदंडाची अंमलबजावणी करावी. मुलांसोबत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे असून अशा वेळी प्रतिकार करण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे
– शेखर सिंह, महापालिका आयुक्त तथा प्रशासक

कोट २ –

विद्यार्थी सुरक्षा हा विषय खूप संवेदनशील असून मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राथमिकता समजून प्राधान्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे. शाळांमध्ये आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे, सखी सावित्री समितीची स्थापना करणे, मुलांच्या सुरक्षिततेबाबत काही संशयास्पद आढळल्यास त्वरित पोलीस प्रशासनास कळविणे, शाळेमध्ये नियुक्त केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी करणे तसेच दामिनी पथकासोबत योग्य समन्वय साधून विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण देणे आदी उपाययोजनांचा करणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस प्रशासनाचेही सहकार्य शाळांना लाभणार आहे. तसेच रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत महिलांना प्रवासादरम्यान किंवा कोणत्याही ठिकाणी असुरक्षित वाटल्यास त्या ११२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. पोलीसांच्या वतीने त्यांना तात्काळ मदत पोहोचविण्याची कार्यवाही केली जाईल तसेच सुरक्षित स्थळी त्यांना पोहोचविण्यात येईल. पिंपरी चिंचवड शहरातील वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन २४ तास कार्यरत असून यामध्ये नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्वाचे आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांमध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या भरतीमध्येही भरती झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा समावेश होता. महिलांविषयीच्या कोणत्याही तक्रारींचे निवारण करण्यासाठी, त्यांच्या सहकार्यासाठी किंवा त्यांना मानसिक आधार देण्यासाठी पोलीस प्रशासन तत्पर आहे.
-विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड शहर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button