पालखी सोहळ्याने एसपीजी इंटरनेशनल स्कूल गजरात निनादले!
पारंपरिक वेशभूषा, अभंगगायन आणि टाळ-मृदंगाच्या साथीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी | एसपीजी इंटरनेशनल पब्लिक स्कूल, भोसरी येथे दिनांक १८ जून रोजी पारंपरिक आणि पावन अशा पालखी सोहळ्याचे उत्साही आयोजन करण्यात आले. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याला शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती पूजनाने झाली. पूजन सोहळा श्री. पांडुरंग नाना गवळी, श्री. नितिन मधुकर लोणारी आणि श्री. स्वप्निल पांडुरंग गवळी यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर आरती करण्यात आली आणि संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

हेही वाचा : शिक्षण विश्व: गुरूंच्या चरणी श्रद्धा, विद्यार्थ्यांच्या मनात संस्कारांची पेरणी
शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी प्रदक्षिणा घेतली. अभंगगायन सादर करत विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा जिवंत अनुभव उपस्थितांना दिला. इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी, फलक सजावट, घोषवाक्य आणि गीतांच्या सादरीकरणातून सोहळ्याचे सौंदर्य वाढवले.
संतांच्या विचारातून जीवनाला दिशा..
मुख्याध्यापक डॉ. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, “संतांच्या विचारांमधून जीवनाला दिशा मिळते, आणि हे विचार वर्तनात उतरवले तरच खरे शिक्षण पूर्ण होते.” कार्यक्रमाच्या शेवटी पालखी मिरवणूक पार पडली व उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण सोहळा आनंद, श्रद्धा व संस्कृतीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.





