शिक्षण विश्व: गुरूंच्या चरणी श्रद्धा, विद्यार्थ्यांच्या मनात संस्कारांची पेरणी
गुरू पौर्णिमेनिमित्त संत साई हायस्कूलमध्ये भक्तिभावाने गुरूंचा सन्मान

पिंपरी | संत साई हायस्कूल, भोसरी येथे गुरू पौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने आणि आनंदात गुरूंचा सन्मान करत कार्यक्रम साजरा केला. शाळेचे संस्थापक व मुख्याध्यापक श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर आणि मुख्याध्यापिका सौ. सुनिता ढवळेश्वर मॅडम यांच्या पाद्यपूजनाने व औक्षणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संत साई बाबांच्या प्रतिमेचे पूजन व आरतीने वातावरण भक्तिमय झाले होते.
विद्यार्थ्यांनी वर्गाच्या बाहेर रांगोळ्या काढून आपल्या शिक्षकांचे औक्षण करत स्वागत केले. इयत्ता ५वी, ७वी व ८वीच्या विद्यार्थ्यांनी गुरूंचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर केली. शिक्षिका सौ. स्वाती गोसावी यांनी “गुरू-शिष्य नाते” यावर प्रेरणादायी विचार मांडले.

हेही वाचा : देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ‘जनसुरक्षा’ विधेयक महत्त्वाचे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्याध्यापक श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरूंचे स्थान आणि त्यांची महती विषद केली. त्यांनी आपल्या अध्यात्मिक गुरू श्री. सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या पत्राचे इंग्रजी वाचन कु. पायल ढवळेश्वर मॅडम यांनी, तर मराठी वाचन श्री. भागवत वानखेडे सर यांनी केले.

विध्यार्थी- पालकांचा उत्स्फूर्त सहभाग..
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये उपमुख्याध्यापिका सौ. रूपाली खोल्लम, मनोज वाबळे सर, व कला शिक्षक श्री. संजय अनर्थे यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका श्वेता नारायणगावकर यांनी केले. या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीतील ‘गुरू महात्म्य’ समजून घेतले आणि गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.





