जिजामाता रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, निवासी डॉक्टर उपलब्ध करुन द्यावा – डब्बू आसवानी
![Specialist Doctors, Resident Doctors should be made available in Jijamata Hospital - Dabbu Aswani](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-25T150712.438.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात अत्यावश्यक व गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करावेत. रात्रीच्या तातडीच्या रुग्णांसाठी एका निवासी डॉक्टर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी माजी उपमहापौर, स्थानिक नगरसेवक डब्बू आसवानी यांनी केली.याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक आसवानी यांनी म्हटले आहे की, पिंपरीतील जिजामाता रुग्णालयाचे काही दिवसांपूर्वी नुतनीकरण झालेले आहे. रुग्णालय अत्यावश्यक सेवेस परिपूर्ण सज्ज केलेले आहे. परंतु, रुग्णालयात किरकोळ आजार असलेल्या रुग्णांसाठी आणि प्रसुतीसाठीच डॉक्टर उपलब्ध आहेत. गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी किंवा अत्यावश्यक सेवेसाठी डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्याठिकाणी एखाद्या अपघाती किंवा आत्महत्येचा प्रयत्न केलेला रुग्ण उपचारासाठी आला. तर, तेथे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यामुळे रुग्णाला वायसीएम रुग्णालयात पाठवले जाते.
तातडीच्या सेवेसाठी आलेल्या रुग्णाला एवढ्या मोठ्या सुसज्ज रुग्णालयात उपचार मिळत नाहीत. एवढे मोठे रुग्णालय फक्त प्रसुतीच्या उपचारासाठी बांधले असेल. तर, जाहीर करावे. इतर रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि शस्त्रक्रियेची व्यवस्था केली. तर, वायसीएमवरीलही ताण कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी जिजामाता रुग्णालयात अत्यावश्यक व गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करावेत. रात्रीच्या तातडीच्या रुग्णांसाठी एका निवासी डॉक्टर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी नगरसेवक आसवानी यांनी निवेदनातून केली आहे.