विशेष लेख : डेडलाईन नसलेला पत्रकार : विजय भोसले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Vijay-Bhosale-780x470.jpg)
पत्रकार विजय भोसले यांनी पत्रकारितेपेक्षा जास्त कशाचा आयुष्यभर विचार केला असेल, असे वाटत नाही. पत्रकारिता हेच त्यांचे जग होते. त्यांच्या हाताखाली असंख्य माणसे घडली. मीही केसरीतूनच भोसले सरांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेचे धडे गिरवायला सुरुवात केली. जर्नालिझमला फर्स्ट क्लास मिळूनही कुठे संधी मिळत नव्हती. अर्ज, विनंत्या केल्या. पण, कुठूनच प्रतिसाद मिळेना. मी काहीसा निराश झालो होतो. एक दिवस म्हटलं, चला केसरीच्या पिंपरी कार्यालयात फोन करू. फोन लावला, समोरून भोसले सरच बोलत होते. त्यांनी भेटायला बोलावले. त्यानुसार भेटायला गेलो. उद्या लगेच रुजू हो म्हणाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी आठलाच कार्यालयात हजर झालो. काही वेळानंतर सर आले नि माझी पत्रकारिता रितसरपणे सुरू झाली. रात्री अकराला कामकाज आटोपले नि मी बाहेर पडलो. मग दिनक्रम सुरू झाला. सर फार काही शिकवायच्या भानगडीत पडत नसत. ते म्हणायचे पत्रकारिता स्वतःच स्वतःला शिकावी लागते. ती शिकण्याची गोष्ट नाही.
दोन-तीन दिवस होत नाहीत, तोच त्यांनी मोठे कार्यक्रम द्यायला सुरुवात केली. कोणताही अनुभव नसताना बडे नेते, मंत्री यांचे कार्यक्रम ते देत. तेव्हा वाटे अजून परफेक्ट बातमी लिहिता येत नसताना हे कसे काय महत्त्वाचे कार्यक्रम देतात..? पण, नंतर भीड चेपत गेली आणि यामागचे उत्तर आपोआप मिळाले.
भोसले सरांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पत्रकारितेला कोणतीही डेडलाईन नव्हती. दिवस उगवायच्या आधी त्यांचा दिवस सुरू होई नि तो कधी संपेल, याला काही वेळकाळ नसे. जेवणाचे टायमिंग, जीवनशैली याची सांगड ते कशी घालतात, असा प्रश्न पडे.
काही काळानंतर मी पुण्यात पत्रकारितेकरिता आलो. त्यामुळे तितकासा संपर्क राहिला नाही. अधूनमधून कधी भेट झाली, तर चर्चा होत असे. राजकारण, हा त्यांचा आवडता प्रांत. पिंपरीपासून राज्याच्या राजकारणापर्यंतचे अनेक किस्से ते सांगत. एखादी गोष्ट रंगवून सांगण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्याचबरोबर दांडगा जनसंपर्क हा त्यांचा विशेष होता. पालिकेतील शिपायापासून ते अधिकारी-पदाधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाशी त्यांचा संवाद होता. उद्या वाचा, असे त्यांनी म्हटले, की उद्याच्या केसरीत काहीतरी खळबळजनक असणार आणि भोसले साहेब कुणाची तरी वाट लावणार, असे सगळ्यांना वाटे. त्यांचा पिंड निर्भीड पत्रकाराचा. त्यामुळे लिहिताना ते कुणाचा मुलाहिजा बाळगत नसत. पूर्वी एका नगरसेवकाविरोधात लिहिल्याने झालेली धक्काबुक्की, अंधश्रद्धेचे त्यांनी बाहेर काढलेले प्रकरण, अशी काही कात्रणे ते दाखवत असत. तेव्हा त्यांच्या धाडसाची कल्पना येई. मागची दोन दशके ते विधीमंडळ वार्तांकन करत. त्याचे समालोचन केसरीत वाचायला मिळत असे.
प्रत्येक माणसाबद्दल काही मतमतांतरे असू शकतात. तशी ती त्यांच्याबद्दलही असू शकतील. पण, सरांनी आमच्यासारख्या अनेकांना संधी दिली, हे फार महत्त्वाचे वाटते. त्यामुळे आज आम्ही पत्रकारितेत चार अक्षरे लिहू शकतो. संधी देणे, ही त्यांची खासियत होती. त्यातून पत्रकारितेचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या गुणी माणसांनाही पत्रकारितेत ठसा उमटविणे शक्य झाले.
एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांची प्रकृती बिघडते आणि त्यानंतर दोन दिवसांत ही धक्कादायक बातमी कानावर येते, हे सारे दुःखदायक आहे. सरांनी प्रकृतीची काळजी घ्यायला हवी होती, अशी सर्वांचीच भावना असेल. तथापि, पत्रकारिता हा आपला प्राधान्यक्रम सरांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपला. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
- प्रशांत चव्हाण