पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेतर्फे तिरंगा रॅली
भारतीय सेनादलाचा गौरव; शिवसैनिकांचा प्रतिसाद

पिंपरी चिंचवड | पहलगाम हल्ल्याचे चोख प्रतिउत्तर भारतीय लष्कर, वायुदल, आणि नौदलाने “ऑपरेशन सिंदूर”च्या माध्यमातून दिले. दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटक व ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच भारतीय संरक्षण दलाच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी आज पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना उपनेते इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर व भोसरी विधानसभा शहर प्रमुख संभाजीराव शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली.
हेही वाचा : यशस्वी कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांचा गौरव
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मध्ये ही तिरंगा यात्रा काढण्यात आली. तिरंगा यात्रेमध्ये सहभाग घेत मोठ्या उत्साहामध्ये शिवसैनिकांनी,युवकांनी ऑपरेशन सिंदूरच्या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय सैन्याचा जय-जयकार केला.
यावेळी तिरंगा रॅलीमध्ये शिवसेना महिला उपनेत्या सुलभा उबाळे, शिवसेना नेते निलेश मुटके,शिवसेना खेड तालुकाप्रमुख निलेश पवार, दादासाहेब उर्फ संतोष उकिर्डे युवा सेना जिल्हा उपप्रमुख अरुण जोगदंड उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानातील अतिरेक्यांचे आठ तळ उद्ध्वस्त केल्याबद्दल भारतीय सेनादलाचे अभिनंदन करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
– इरफान सय्यद, शिवसेना, उपनेते.