‘समाजकंटक गुणरत्न सदावर्तेवर गुन्हा दाखल करा’; सतीश काळे
वाकड पोलिस स्टेशनला मराठा क्रांती मोर्चाची तक्रार
![Satish Kale said that a case should be filed against the social activist Gunaratna Sadavarte](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Satish-Kale-PCMC-780x470.jpg)
पिंपरी : दोन समाजात तेढ निर्माण करणारी बेताल वक्तव्ये करणाऱ्या समाजकंटक गुणरत्न सदार्वे याच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करा, असा तक्रारी अर्ज मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतिश काळे यांनी दिला आहे. वाकड पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रारी अर्जात ही मागणी करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या भावना दुखाविणारी वक्तव्ये देखील ते करत आहेत. त्यांना वेळीच आळा घाला, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असाही इशारा काळे यांनी तक्रारी अर्जात दिला आहे.
काळे यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की, वकिलीच्या माध्यमातून लोकांना न्याय देणे अपेक्षित आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम वकील करतात. मात्र गुणरत्न सदावर्ते वकिलीचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करण्याची कामे करत आहेत. त्याची नाहक किंमत सदावर्ते यांना भोगावी लागली आहे. बेताल वक्तव्यामुळे तसेच बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी मा. न्यायालयाने सदावर्ते याची वकिलीची सनद देखील दोन वर्षासाठी रद्द केलेली आहे. त्यांना छुपा पाठिंबा असणाऱ्या राजकीय नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी बेताल वक्तव्य सदावर्ते करत आहेत. सनद जाऊन देखील त्याच्या वागणूकीत बदल होताना दिसत नाही.
हेही वाचा – राष्ट्रीय सोलर व्हेईकल चॅलेंज स्पर्धेत ‘पीसीसीओई’चा दबदबा
नुकतीच अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून करोडो मराठा बांधव स्व-इच्छेने सभेसाठी जमले होते. ते स्वाभिमानाची लढाई लढत आहेत. ही लढाई उत्स्फूर्तपणे लढली जात आहे. मात्र या मराठा बांधवांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रकार गुणरत्न सदावर्ते याच्याकडून केले जात आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेली सभा ही जत्रा असल्याचे बेताल वक्तव्य सदावर्ते यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याला काडीची किंमत नसली तरी अशा प्रवृत्तीला वेळीच रोखणे गरजेचे आहे.
सदावर्ते मराठा आणि इतर समाजात तेढ निर्माण होईल, असे वातावरण निर्माण करत आहेत. मराठा समाज बांधव हा सुज्ञ आहे. तो या षडयंत्राला बळी पडणार नाही. तसेच इतरही समाजातील बांधव सदावर्तेच्या वक्तव्याचा गैर अर्थ काढणार नाहीत. मात्र सदावर्ते सारख्या चुकीच्या माणसांना रोखण्यासाठी आणि सर्व समाजात एकोपा राहण्यासाठी सदावर्ते याच्यावर मराठा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी तसेच दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्वरीत गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. त्याची वक्तव्ये थांबली नाहीत, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच सदावर्तेला मराठा समाज बांधवांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी, असे काळे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे.