पिंपरीत बनावट ‘पुमा’ ब्रँडची विक्री; मोठा माल जप्त, एकावर गुन्हा

पिंपरी | पिंपरी परिसरात बनावट ब्रँडेड कपड्यांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘पुमा’ कंपनीचा बनावट लोगो वापरून लाखोंचा माल विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या आरोपीवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० मार्च २०२६ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास साई चौक, शनी मंदिराजवळील लेजंड चॉईस परिसरात ही कारवाई करण्यात आली. येथे छापा टाकून पोलिसांनी सुमारे ८६ हजार १८४ रुपयांचा बनावट कपड्यांचा साठा जप्त केला. यामध्ये टी-शर्ट, हाफ पॅन्ट आणि ट्रॅक पॅन्टचा समावेश आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये मोकाट जनावरांचा वाढता धोका
या प्रकरणी इस्माईल इस्तीखर खान (वय ३१, रा. विजयनगर, काळेवाडी, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा बनावट ‘पुमा’ लोगो लावून कपडे विक्रीसाठी ठेवत होता. या माध्यमातून ग्राहकांची तसेच कंपनीची आर्थिक फसवणूक करण्याचा त्याचा उद्देश असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या घटनेप्रकरणी नीरजकुमार नरेंद्रकुमार दहिया (वय ३८, रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावून पुढील कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १६६/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३४७, ३४९ तसेच कॉपीराइट कायद्यांतर्गत कलम ५१, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षकांकडून पुढील तपास सुरू असून, शहरात बनावट ब्रँडच्या मालाविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





