विकासकामांना चालना देण्यासाठी आचारसंहिता शिथील करा : आमदार महेश लांडगे
राज्याचे निवडणूक आयुक्त उर्विंदर पाल सिंह मदान यांना निवेदन
![Relax code of conduct to promote development work: MLA Mahesh Landge](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Mahesh-Landge-4-780x470.jpg)
पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पाच टप्प्यांतील मतदान प्रक्रिया दि. २० मे रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे निवडणूक आदर्श आचार संहिता शिथील करावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत पावसाळा पूर्व कामे आणि विकासकामांना चालना द्यावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे निवडणूक आयुक्त उर्विंदर पाल सिंह मदान यांना निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दि. १७ मार्च २०२४ पासून राज्यात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत चार टप्पयांतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, दि. २० मे रोजी शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होईल.
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील विकासकामे ठप्प आहेत. नवीन विकासकामे आणि प्रकल्पांबाबत प्रशासनाला आचारसंहितेमुळे निर्णय घेता येत नाही. दि. २० मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यास प्रलंबित विकासकामांना गती देता येणार आहे.
दरम्यान, राज्यात अवकाळी पावसाळामुळे मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुख्य शहरांमध्ये काही दुर्घटना घडल्या आहेत. घाटकोपर-मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेमध्ये १८ नागरिक मृत्यूमूखी पडले आहेत. धोकादायक ठिकाणे आणि सुरक्षेच्या बाबतीत उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना आचार संहितेची अडचण होत आहे, असेही आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील पावसाळापूर्व कामे मार्गी लावणे महत्त्वाचे असून, दि. २० मे नंतर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आचार संहिता शिथील करावी. तसेच, विकासकामांबाबत निर्णय घेण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देशीत करावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याही ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.