राजगुरुनगर न्यायालयाकडून हगवणे पिता पुत्राला पोलीस कोठडी
जेसीबी मशीन फसवणूक प्रकरण

पिंपरी | वैष्णवी हगवणे मृत्यु प्रकरणातील आरोपी हगवणे माय-लेकावर जेसीबी मशिनच्या व्यवहारात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महाळूंगे एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीतून मंगळवारी (दि. ३) या माय-लेकाला ताब्यात घेतले. राजगुरूनगर न्यायालयात हजर केले असता दोघांनाही तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
प्रशांत अविनाश येळवंडे (वय ३३, रा. निघोजे, ता. खेड) यांनी २९ मे रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, शशांक राजेंद्र हगवणे आणि लता राजेंद्र हगवणे (दोघे रा. भुकूम, ता. मुळशी) या माय-लेका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. लता हगवणे हिच्या नावावर असलेले जेसीबी मशीन प्रशांत येळवंडे यांनी खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. जेसीबीच्या बँक कर्जाच्या हप्त्याची दरमहा ५० हजारांची रक्कम येळवंडे हे शशांकला देत होते. मात्र, त्याने हप्ते न भरता रिकव्हरी एजंटला हाताशी धरून जेसीबी मशीन येळवंडे यांच्याकडून काढून स्वत:च्या ताब्यात घेतले. येळवंडे हे संबंधित रक्कम किंवा मशीनची मागणी करण्यासाठी गेले. त्यावेळी शशांकने पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात येळवंडे यांना ११ लाख ७० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला.
हेही वाचा : पिंपरी पालिका हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणार
वैष्णवी हगवणे मृत्यु प्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या शशांक व लता यांना महाळूंगे एमआयडीसी पोलिसांनी येरवडा कारागृहातून मंगळवारी (दि. ३) ताब्यात घेतले. राजगुरूनगर न्यायालयात त्यांना हजर केले असता दोघांनाही ६ जुनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी दिली.