लोणावळा व मावळातील पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक बंदीचे आदेश
पवना धरणासह एकवीरा देवी, कार्ला, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोणा गडाचा समावेश

७ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक बंदी
लोणावळा : लोणावळा, खंडाळ्यासह मावळ तालुक्यात पावसाळ्यात वर्षाविहार व पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, होणारे अपघात तसेच काही उपद्रवी पर्यटकांच्या बेफिकीरीमुळे घडणाऱ्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर व परिसरातील काही पर्यटन स्थळांसह मावळातील काही पर्यटन स्थळांवर कायदा व सुव्यवस्थेचा दृष्टीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुंडी यांनी ७ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोणा या गड किल्ल्यांसह, टायगर, लायन्स व शिवलिंग पॉईंट आणि पवनाधरण या पर्यटनस्थळांचा समावेश असुन, येथील धोकादायक ठिकाणी पर्यटनास प्रतिबंधात्मक बंदी घालण्यात आली आहे.
पर्यटकांचे सर्वात आकर्षण असलेले लोणावळ्यातील भुशी धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील बाजूस असलेल्या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात गतवर्षी ३० जूनला पुण्यातील हडपसर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुणे जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनाने लोणावळा, खंडाळा व मावळातील धोकादायक पर्यटनस्थळांवर काही प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करत उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हुल्लडबाजी, स्टंटगिरी करणारे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला.
हेही वाचा – SEBIचा मोठा निर्णय: ‘या’ तारखेपासून नवीन UPI पेमेंट सिस्टम होणार लागू
चार दिवसांपूर्वी रविवारी दोन पर्यटकांचा भुशी धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेसह मागील वर्षी घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वर्षाविहार व पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी व घडणाऱ्या अपघातांसह काही उपद्रवी पर्यटकांच्या बेफिकीरीमुळे घडणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुंडी यांनी कार्ला येथील श्री एकवीरा देवी मंदिर, कार्ला व भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तुंग व तिकोना या गड किल्ल्यांसह लोणावळा परिसरातील टायगर, लायन्स व शिवलिंग पॉईंट्स, पवना धरण परिसरातील धोकादायक ठिकाणांसह गतवर्षी भुशी धरण परिसरात घडलेल्या मोठ्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भुशी धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील मागील बाजूस असलेल्या धबधबा परिसरात पर्यटकांना पर्यटनास प्रतिबंधात्मक बंदीचे आदेश दिले आहेत. पर्यटन स्थळांवरील प्रतिबंधात्मक आदेशामुळे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट होऊन व्यवसायावर परिणाम होण्याच्या भितीने त्या त्या ठिकाणच्या स्थानिक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
प्रशासनाने घातलेली प्रमुख बंधने पुढीलप्रमाणे*
*धबधब्यावर किंवा वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरून पोहण्यास मनाई.
*धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे किंवा चित्रीकरण करू नये.
*नैसर्गिक धबधब्यांजवळ मद्यपान, अनधिकृत मद्यविक्री किंवा मद्य सेवनास बंदी.
* सार्वजनिक ठिकाणी कचरा, प्लास्टिक वस्तू किंवा बाटल्या टाकणे निषिद्ध.
*सार्वजनिक ठिकाणी महिलांशी असभ्य वर्तन किंवा छेडछाड केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
*सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात गाणी, डीजे वाजविणे आणि ध्वनी प्रदूषणास मनाई
*धबधबे, धरण परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी (आवश्यक सेवेतील वाहन वगळून)
*रस्त्यावर वाहने अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने पार्क करणे किंवा बेदरकार वाहन चालवणे निषिद्ध