गवळीनगर-चक्रपाणी प्रभागात प्रियांका बारसे यांची प्रचारात आघाडी
मिशन- PCMC : महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरी प्रभाग क्रमांक ५ मधील राजकीय वातावरण तापू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) उमेदवार माजी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवारी जाहीर होताच त्यांनी घराघरांत संपर्क साधत जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून, त्यांच्या दौऱ्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका बारसे यांच्यावर पक्ष नेतृत्वाने पुन्हा विश्वास टाकला आहे. २०१७ च्या कार्यकाळात त्यांनी राबवलेली विकासकामे, प्रभावी जनसंपर्क आणि प्रशासनातील अनुभव हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख आधार ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत शिक्षण सभापती म्हणून काम करताना त्यांनी घेतलेले निर्णय आणि दाखवलेली कार्यक्षमता आजही मतदारांच्या स्मरणात आहे.
हेही वाचा – प्रभाग ५ च्या विकासासाठी अॅड. राहुल गवळी मैदानात!
स्थानिक रहिवासी असल्यामुळे प्रभागातील नागरिकांशी असलेले थेट आणि आपुलकीचे नाते हे बारसे यांचे मोठे बलस्थान मानले जात आहे. प्रचारादरम्यान त्यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला आहे. महिलांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “बचत गटांच्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महिलांना केवळ साक्षर नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हेच माझे ध्येय आहे.”
प्रचार रॅली, पदयात्रा आणि बैठकींमध्ये महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे. प्रलंबित नागरी समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि सर्वांगीण विकासाबाबत त्यांनी आपले स्पष्ट व्हिजन मतदारांसमोर मांडले. “भोसरी प्रभाग क्रमांक ५ चा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“भोसरी प्रभाग ५ मधील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हेच माझे ध्येय आहे. पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि युवकांना रोजगाराच्या संधी देत हा प्रभाग विकासाचा आदर्श बनवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन.”
– प्रियांका बारसे, उमेदवार, राष्ट्रवादी.




