गावोगावी घाटांमध्ये शर्यतीच्या बैलांचा सराव सुरु

पिंपरी : मावळ तालुक्यातील ग्रमीण भागात गावोगावच्या ग्रामदैवतांचा यात्रांचा हंगाम तोंडावर आल्याने बैलगाडा मालक सज्ज झाले आहेत. गावोगावी यात्राकाळात होणाऱ्या बैलगाडा शर्यतीमध्ये आपल्या गाड्याचा प्रथम क्रमांक कसा येईल, यासाठी बैलगाडा मालक बैलांचा नित्यनेमाने सराव करुन घेताना दिसत आहे. गावोगावी असणाऱ्या घाटामध्ये सध्या हेच चित्र पाहायला मिळत असून सरावाची शर्यत पाहायला येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे.
बैलगाडा शर्यतीच्या घाटांमध्ये सध्या बैलांचा सराव पाहण्यासाठी बैलगाडा शौकीन गर्दी करताना दिसत आहेत. मावळ तालुक्यातील आंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ आदी ठिकाणच्या गावांमधील ग्रामदैवतांच्या यात्रा-जत्रांना लवकरच सुरुवात होईळ. या यात्रांमधील प्रमुख आकर्षण हे बैलगाडा शर्यतींचे असते.
हेही वाचा – मध्य प्रदेश आणि राजस्थान प्रमाणे भाजप महाराष्ट्रात ही सरप्राईज देणार?
प्रत्येक छोट्या मोठ्या गावांमध्ये देखील अलिकडे बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. यासाठी बैलगाडा मालकांसाठी बक्षीसे देखील मोठ्या प्रमाणावर ठेवली जातात. बैलगाडा शर्यतीची तयारी म्हणून आतापासून बैलगाडा मालकांनी बैलांचा सराव करुन घेण्यास सुरुवात केली आहे. गावोगावी बैलगाडा शर्यतीच्या घाटांमध्ये मालकांनी नवीन खरेदी केलेल्या बैल व घोड्यांचा सराव सुरू केलेला दिसत आहे.
बैलगाडा शर्यतीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे बैलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविल्याने गेल्या वर्षभरात बैलांच्या किंमती जवळपास दुप्पट झालेल्या दिसतात. बैलगाडा मालक हे लाखो रुपये देऊन बैल खरेदी करू लागले आहेत. बैल जर घाटात चांगल्या वेगाने पळाला तर त्याच्या किमती दुपटीने वाढ होते. त्यामुळे बैलगाडा मालक बैलांचा घाटात पळण्याचा सराव करून घेताना दिसत आहेत.
बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्याने गावोगावच्या यात्रा पुन्हा जोमाने भरत आहे. त्यामुळे तिथे येणाऱ्या लहान मोठ्या व्यावसायिकांना चांगले दिवस आले आहेत. वडापाव, आईस्क्रीम विक्रेत्यांपासून ते मिठाई, खेळणी विक्रेत्यांना यामुळे सुगीचे दिवस आले आहेत. मावळ तालुक्यातील सर्व बैलगाडा प्रेमी तसेच बैलगाडा मालक यात्रेनिमित्त बैलगाडा स्पर्धांचे आयोजन मोठ्या उत्साहाने करीत आहेत.