वीज चोरी सुरूच, एकाच दिवशी जिल्ह्यात 1,066 ठिकाणी अनधिकृत वीजवापर उघड
![Power theft continues, unauthorized power consumption exposed in 1,066 places in the district on the same day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/01-1-e1631855523312.jpg)
पुणे | ऑगस्टनंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी पुणे प्रादेशिक विभागात महावितरणने विशेष मोहिम राबविली. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये 2 हजार 237 ठिकाणी वीजचोऱ्या व विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आणला आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात 1,066 ठिकाणी अनधिकृत वीजवापर उघड केला आहे. वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम 135 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.पुणे प्रादेशिक विभागात वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध नियमित कारवाई सुरु आहे. सोबतच वीजचोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार एक दिवसीय विशेष मोहीम घेण्यात येत आहे. गेल्या ऑगस्टमध्ये ही विशेष मोहीम घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा 11 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता या मोहिमेला सुरवात करण्यात आली. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी शेकडो अभियंता व कर्मचाऱ्यांनी विविध पथकांद्वारे वीजचोरीविरोधात कारवाई सुरु केली.
यामध्ये दिवसभरात पाचही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदींच्या 18 हजार 37 वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 2,237 ठिकाणी वीजचोऱ्या व अनधिकृत वीजवापर आढळून आला. या मोहिमेत सुमारे 20 लाख 66 हजार युनिटची वीजचोरी झाल्याचे प्राथमिक तपासणी दिसून आल्याने त्याची वसुली करण्यासाठी सुमारे 3 कोटी 18 लाख 25 हजार रुपयांचे वीजबिल संबंधीत ग्राहकांना देण्यात येत आहेत. नियमाप्रमाणे दंड व वीजचोरीचे बिल न भरल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.या विशेष मोहिमेत पुणे जिल्ह्यात 1,066 ठिकाणी 1 कोटी 95 लाख 57 हजार, सातारा जिल्हा- 141 ठिकाणी 11 लाख 53 हजार, सोलापूर जिल्हा- 647 ठिकाणी 62 लाख 60 हजार, कोल्हापूर जिल्हा- 182 ठिकाणी 41 लाख 11 हजार आणि सांगली जिल्ह्यामध्ये 201 ठिकाणी 7 लाख 43 हजार रुपयांच्या वीजचोऱ्या व अनधिकृत वीजवापर आढळून आला आहे.
उघडकीस आलेल्या वीजचोऱ्या विशेषतः सधन व सुशिक्षित घरगुती, व्यावसायिकांसह कृषीग्राहकांकडील आहेत. वीजबिलांच्या थकबाकीमुळे खंडित आलेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीजवापर करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध सुद्धा या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात आली.